आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:फक्त संतसाहित्यालाच नव्हे तर सत्पुरुषालाही गमावले; कवी कमलाकर देसले यांची शोकसभा, उपस्थितांच्या भावना

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतसाहित्याशी केवळ लेखन म्हणून कमलाकर देसले यांची नाळ जोडलेली नव्हती तर त्यांचं व्यक्तिमत्त्वच संत आणि सज्जनतेचं होतं. त्यामुळे आपण फक्त संतसाहित्यालाच नव्हे तर सत्पुरुषालाही गमावले आहे, अशा भावना ज्येष्ठ कवी, संतसाहित्याचे अभ्यासक कमलाकार देसले यांच्या शोकसभेत व्यक्त झाल्या. एकनाथ पगार यांच्या अध्यक्षतेखाली मु. शं. औरंगाबादकर सभागृहात अनेक संस्थांच्या वतीने आबा देसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी देसले यांचा मुलगा ओम देसले उपस्थित होता.

एकनाथ पगार : देसले यांच्या कवितेत भरजरी शब्द नसतीलही पण ते त्यांच्या काव्यात स्वत:चे आणि इतरांचेही जगणं लिहायचे म्हणून त्यांची कविता रसिकांनी डोक्यावर घेतली. कवी, गझलकार, प्रवचनकार आणि अष्टपैलू शिक्षक त्यांची ओळख असली तरी ती माणूस म्हणून अधिक गडद होती.

सुनील कुटे, उपाध्यक्ष, सावाना : संतमंडळींनी गद्य फार कमी लिहिलं पण पद्य लिहिली. आबा त्याच परंपरेचे पाईक होते. जो माणूस संतत्वाला पोहोचतो तोच अशा पद्धतीचे काव्य लिहू शकतो. ज्ञान, कर्म आणि भक्ती हाच वारसा त्यांनी चालवला.

जयप्रकाश जातेगावकर, लोकहितवादी मंडळ : संतपरंपरेतील एका नव्या मांडणीची कविता पोहोचवत ठसा आबांनी उमटवला. उपेक्षितांच्या वेदना जाणून घेऊन त्या शब्दांतून पोहोचवणारा आधारवड गेला.

सुभाष सबनीस, नाशिक कवी, मराठी कथा लेखक संघ : कवितेवर जीवापाड प्रेम करणारा संतवृत्तीचा माणूस. त्यांच्या कवितेत ताकद आणि प्रगल्भता होती.

गिरीश नातू, कार्याध्यक्ष, सावाना : आबांनी जीवनविषयक तत्त्वज्ञान सक्षमपणे मांडलं. त्यांच्यातील सृजनशीलता हा गुण माणूसपणाशी नातं जोडणारा होता.

श्रीकांत बेणी, वसंत व्याख्यानमाला : माणुसकीने ओथंबलेलं असं व्यक्तिमत्त्व नाशिक शहरानेच नव्हे तर साहित्य, संस्कृती क्षेत्राने हरवलं आहे. वसंत व्याख्यानमालेत ते अनेकदा यायचे. त्यांनी कार्यक्रमही केला होता.

विलास पोतदार, अ. भा. मराठी प्रकाशक संघ, नाशिक शाखा : कवी कुळातील एक वेगळं व्यक्तिमत्त्व म्हणजे कमलाकर देसले होते. कोणाच्या खांद्यावर हक्काने मान ठेवावी, मार्गदर्शन घ्यावं ते हक्काच स्थान ते होते.

रवींद्र मालुंजकर, मसाप, नाशिकरोड शाखा: आबा म्हणजे जितका मोठा कवी तितकाच विनम्र माणूस, मित्र आणि पाठीराखा होते. त्यांचा झाडू ते खडू हा प्रवास सगळ्यांनाच ज्ञात आहे. यासह यशवंत पाटील, प्रा. राज शेळके, राजेंद्र सोमवंशी, संजय गोरडे संदीप जगताप, अरुण इंगळे, अजय बिरारी यांनीही शोकभावना व्यक्त केल्या. राजेंद्र उगले यांनी निवेदन केले.

बातम्या आणखी आहेत...