आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी महा-इ-सेवा केंद्रांची झाडाझडती; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रचालकांचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महा-इ-सेवा केंद्र चालकांकडून होणारी ग्राहकांची आर्थिक लूट, मनमानीला आळा घालण्यासाठी नाशिक तहसीलदारांनी एकाच दिवसात बुधवारी (दि. ११) शहरासह तालुक्यातील सर्वच महा-इ-सेवा केंद्रांची तपासणी करत चांगलीच झाडाझडती घेतली. त्यात नियमानुसार सर्व बाबी आणि आदेशाचे पालन होत की नाही, याची प्रत्यक्ष केंद्रांवर जाऊन तपासणी करून खात्री करण्यात आली. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्र चालकांचा अहवाल तयार करून लागलीच तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून दोषींवर आता कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले. दरम्यान, केंद्रांची संख्या अधिक असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी सांगितले. दाखल्यांचे काम सोपे व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्रांची पध्दती मोडीत काढत महा-इ-सेवा केंद्र आणि आपलं सरकार सेवा केंद्रांची निर्मिती केली.

पण आता ही केंद्र स्वतंत्र ठिकाणी कुणाचाही धाक नसल्यागतच कार्यरत झाली असून यातून नागरिकांची मोठी लूट केली जात असल्याच्या घटना पुढे येत आहे. नागरिकांकडून विविध शालेय दाखल्यांसाठी अर्ज करण्याची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्या बाजूने शाळकरी विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर केंद्र चालकांकडून लुट केली जात असल्याची बाब दैनिक ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणली. त्यानंतर लागलीच सेतू केंद्रांची बैठक घेऊन सर्वत्र दरफलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या. अन् आठ दिवसांनी लागलीच त्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने अधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील केंद्र चालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले. प्रत्येक तहसीलदारांनी त्या-त्या तालुक्यातील केंद्राची तपासणी करावी असे स्पष्ट करत शाळा- महाविद्यालयांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच नियोजन करण्याच्याही सूचना दिल्या.

त्यानुसार नाशिक तहसीलदारांनी बुधवारीच ३५० केंद्रांची तपासणी करुन केंद्रांची झाडाझडती घेत तेथील सत्य परिस्थिती जाणून जे आढळून आले असाच वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...