आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्री सप्तशृंगी देवीचा महाप्रसाद ‘पौष्टिक’,  अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने दिली मान्यता

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन शक्तीपिठात समावेश असलेल्या श्री सप्तशृंगी गड अाणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरूपिठ या दाेन्ही धार्मिक स्थळांवर भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद हा सुरक्षित आणि पौष्टिक अाहे, अशी माेहाेर अन्नसुरक्षा अाणि मानके प्राधिकरणाने लावली अाहे. हायजिन अाॅफरिंग टू गाॅड -‘भाेग’ या अंतर्गत महाप्रसाद प्रमाणित करण्यात अाला अाहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळवणारे देशातील केवळ ३०० तर महाराष्ट्रातील सिध्दिविनायक मंदिर, इस्काॅन मंदिर, नांदेडचा गुरूव्दारा अन् अक्कलकाेटचे स्वामी समर्थ मंदीर या स्थळांचा समावेश अाहे.

धार्मिक स्थळांत भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद अत्यंत पवित्र मानला जाताे. धार्मिक संस्थांच्या प्रसादालयात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या ‘इट राइट इंडिया’ या उपक्रमांतर्गत देशात ३०० च्या वर धार्मिक स्थळांना प्रमाणित करण्यात आले अाहे. यात अाता जिल्ह्यातील या दाेन तीर्थ स्थळांचा समावेश झाला अाहे. या स्थळांना अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार परवाना मिळवण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत प्रथम अन्न सुरक्षा परीक्षण हाेते, परीक्षण यशस्वी झाल्यानंतर राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांकडून भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडे प्रमाणीकरणासाठी शिफारस केली जाते.

प्रसादालयाच्या व्यवस्थापकांचे प्रयत्न सप्तशृंगी गड प्रसादालयाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, प्रशांत निकम, गुरुपीठ प्रसादालयाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील व मनोज मुरादे यांचे याकरिताचे परिश्रम महत्वाचे ठरले. औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) गणेश परळीकर व सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्र सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख व गोपाल कासार यांनीही सतत पाठपुरावा केला.

उत्कृष्ट ७५ जिल्ह्यांमध्ये नाशिकला स्थान ^जिल्ह्याच्या अन्न सुरक्षा मानांकनामध्ये या यशामुळे निश्चितच वाढ होईल. इट राईट इंडिया हा उपक्रम जिल्ह्यात मनुष्यबळाचा अभाव असताना देखील अन्न व औषध प्रशासनाने यशस्वीरीत्या राबवल्याने नाशिक जिल्ह्याला देशातील अत्र सुरक्षेमध्ये उत्कृष्ठ ७५ जिल्ह्यांमध्ये स्थान मिळाले आहे. - ग. सु. परळीकर, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

बातम्या आणखी आहेत...