आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोना रोखण्यात, खर्चाचे एकत्रित आकडे मिळवण्यातही राज्य सरकार अपयशी

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
खासगी रुग्णालये कशी लूट करीत आहेत हे दर्शवणारा एक फलक पुणे येथे एका नगरसेवकाने लावला आहे. - Divya Marathi
खासगी रुग्णालये कशी लूट करीत आहेत हे दर्शवणारा एक फलक पुणे येथे एका नगरसेवकाने लावला आहे.
  • राज्यातील चाचण्यांत 13 टक्के अहवाल पॉझिटिव्ह, देशात सर्वाधिक प्रमाण; मुंबईत 43 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

चालू आठवड्यात महाराष्ट्रात करण्यात आलेल्या कोरोनाच्या १२ हजार ३६ चाचण्यांपैकी ९ हजार ३१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने, संसर्ग रोखण्यात राज्य शासनाला अपयश आल्याचे पुढे येत आहे. देशात एकूण चाचण्यांपैकी पॉझिटिव्हचे प्रमाण ५ टक्के असताना, महाराष्ट्रातील चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण १३ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्याची राजधानी मुंबईत हे प्रमाण ४३ टक्क्यांच्या घरात गेल्याने कोरोनाच्या साथीने शिखर गाठले आहे. एकंदरच कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्याच्या ‘संयुक्त’ नेतृत्वास अपयश आल्याची टीका होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने राज्यासाठी कोणत्या योजनांतर्गत किती निधी देण्यात आला, याचा तपशील जाहीर केला असताना शासनाने कोरोना निवारण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी नेमक्या कोणत्या खात्यातर्फे किती निधी खर्च केला याची एकत्रित आकडेवारीही राज्य सरकारकडे नाही. सोमवारपासून वित्त मंत्रालय सचिव स्तरावरून हे आकडे संकलित करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना यश आलेले नाही. परिणामी संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारला केलेल्या कामाचा एकत्रित धांडोळा मांडता आला नाही. परिवहनमंत्री म्हणतात श्रमिक ट्रेनचे ६८ कोटी दिले, गृहमंत्री म्हणतात ८५ कोटी. मुख्यमंत्र्यांवर मुंबईच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तर उपमुख्यमंत्री पुण्यात अडकलेले. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्य निर्नायकी अवस्थेत सापडल्याचे दिसते.

चौथा लॉकडाऊन संपत असताना रुग्णसंख्या ५६ हजारांपुढे

> चौथा लॉकडाऊन उठवण्याची मुदत तीन दिवसांवर आली असताना गेल्या आठ दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ५६ हजार पार गेला आहे.

> १७ मे ते २४ मे या कालावधीत केलेल्या १२ हजार ३६ चाचण्यांपैकी ९ हजार ३१३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील पॉझिटिव्हिटीचा सरासरी दर १३ ते १३.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

> मुंबईत रुग्णांना बेड न मिळणे, रुग्णवाहिका न मिळणे, शवागारे भरल्यामुळे कॉरिडॉरमध्ये मृतदेह पडून आहेत. 

> ठाण्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह नगरसेवकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी थेट मंत्रालयाच्या स्तरावरून धावपळ करावी लागली.

> मुंबई पोलिस दलातील १३ पोलिसांचा बळी गेला आहे. दोन कस्टम अधिकारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती २५ मे रोजी मुंबई महापालिकेस कळवून दोन दिवस उलटले तरी कार्गो कॉम्प्लेक्स कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेले नाही.

> खासगी डॉक्टर्स संशयित रुग्णांची माहिती कळवतात तरी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे टेस्टिंग व ट्रेसिंग होत नाही.

> टेस्टिंग लॅब्जमधील प्रलंबित अहवालांची संख्या व अहवाल मिळण्याचा कालावधी सरकारला कमी करता आला नाही.

ठाकरे सरकार उत्तर द्या : ‘दिव्य मराठी’चे प्रश्न

१ कोरोनाच्या संकटात राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती कुठे आहे?

२ लक्षणविरहित रुग्णांना घरी पाठवल्याने वाढणाऱ्या संसर्गाला जबाबदार कोण?

३ मुंबईतील गैरव्यवस्थापनाबद्दल परदेशींची बदली, मग राज्यातील गैरव्यवस्थापनाबद्दल मेहतांवर का मर्जी?

४ खासगी वैद्यकीय क्षेत्राशी संवाद साधण्यात एक महिन्याचा विलंब का?

५ जाहिरातींनंतरही रिक्त राहिलेल्या सरकारी रुग्णालयातील जागांचे काय?

अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न

आमच्यात समन्वय नाही यात तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र काम सुरू आहे. मुंबईसाठी स्वत: मुख्यमंंत्री लक्ष घालून उपाययोजना करीत आहेत. विरोधी पक्षाकडून आम्ही सहकार्याची अपेेक्षा केली होती, परंतु सरकारला बदनाम करण्याचे काम ते करीत आहेत. समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू आणि जनतेला कोरोनाच्या संकटातून मुक्त करू. - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

रुग्णांची संख्या दडवण्याचा प्रयत्न सुरू आहे

राज्यात ही साथ शिखर गाठणार याची सूचना अनेक स्तरांवरून देण्यात येऊनही ही परिस्थिती हाताळू न शकणारे राज्य शासन खूप मोठी चूक करीत आहे. राज्यात नेतृत्वाचा अभाव दिसतो आहे. सत्ताधारी तिन्ही पक्ष, मंत्र्या-मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्री आणि प्रशासन यांच्यात समन्वय नाही. उलट, टेस्टची संख्या कमी करून रुग्णांची संख्या दडवण्याचा अत्यंत गंभीर प्रकार राज्य शासन करीत आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीत, रुग्णवाहिका मिळत नाहीत, अंत्यसंस्कारांसाठी तासन््तास वाट पाहावी लागते, दफनासाठी जागा नाही. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकार फक्त आजचे मरण उद्यावर ढकलते आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

बातम्या आणखी आहेत...