आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा चिभडला:पाणीच पाणी, पावसाचे अन् कांद्याचेही; पावसामुळे खरीप, लेट खरीप कांद्याचे उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता

नाशिक | सचिन वाघएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याने पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. नाशिकमध्ये साधारण सव्वा लाख हेक्टरवर कांदा उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा पावसाने नाशिक व परिसरात घातलेल्या थैमानामुळे कांद्याला फटका बसला आहे. नाशिक येथील लासलगाव बाजारपेठ अशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. असे असतानाही आपल्याकडे कांदा महाग का आहे? कांद्याच्या दरात सारखेच चढ-उतार का? निर्यातबंदी म्हणजे नेमके काय? या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे आपण कायमच हैराण असतो. म्हणून तज्ज्ञांशी चर्चा करून ‘दिव्य मराठीत’ आपल्या या प्रश्नांची ही उत्तरे.

दोन दिवसांमध्ये संपतो आयात केलेला कांदा
कांदा दर वाढल्यानंतर बहुतांश व्यापारी इराण, इराक, तुर्कस्थानमधून कांदा आयात करतात. यंदाही आतापर्यंत २० कंटेनर (६०० मेट्रिक टन) कांदा भारतात आला आहे. परंतु देशातील कांद्याची मागणी लक्षात घेता हा कांदा मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, भोपाळ, इंदूर, पाटणा या शहरांमध्ये दोन दिवसांत संपला जातो. त्यामुळे कांदा आयात होऊनही मागणीवर त्याचा परिणाम होणार नाही. विदेशी कांदा बेचव असल्याने या कांद्याला देशात मागणी कमीच असते.

विदेशी कांदा बेचव, आयात झाला तरी मागणी असेल कमीच
आयात कांदा स्वस्त असेल ?

कांदा आयात झाल्यावर दर कमी होतील, परंतु मागणीएवढा कांदा आयात होत नाही. तसेच भारतीय कांद्याच्या चवीप्रमाणे परदेशी कांद्याला चव नसते. त्यामुळे तो विकला जात नाही. सध्या देशात इराणचा २० कंटेनर कांदा आयात झाला आहे. त्यामुळे स्थानिकपेक्षा आणि आयात केलेल्या कांद्यामध्ये किलोमागे १५ ते २० रुपयांनी कमी भाव असतो.

कांदा का महागलाय ?
सध्या बाजार समितीमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे, मागणीच्या तुलनेच पुरवठा होत नसल्याने आपल्याकडील कांदा महाग झाला. त्याचे दर आपल्याला वधारलेले दिसत आहेत.

भविष्यातील कांद्याचे दर ?
नोव्हेंबरअखेरपर्यंत किरकोळ बाजारात कांदा १०० रुपयांच्या दरम्यान प्रतिकिलो दराने विक्री होईल. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये एका दिवसामध्ये सुमारे ३ हजार मेट्रिक टन कांद्याची उलाढाल होते. सध्या ही उलाढाल एक हजार टनावर आली आहे.

राज्याचा कांदा कुठे जातो ?
महाराष्ट्रातील कांदा हा इराक, इराण, दुबई, श्रीलंका, हाँगकाँग, इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया या देशांमध्ये निर्यात केला जातो.

चांगला कांदा कसा ओळखाल ?
कांद्याचा रंग गुलाबी, लाल असावा. त्याला डाग नसावा, नरम नसावा, तसेच कांद्यातून पाणी येते का याची पाहणी करावी.

बियाण्याचे दर का वाढले ?
गतवर्षी कांदा अधिक दराने विक्री झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे तयार करण्याऐवजी कांदा विक्रीला प्राधान्य दिले. तसेच विदर्भात बियाणे मोठ्या प्रमाणात तयार केले जाते, परंतु पावसामुळे तेथील बियाणे खराब झाल्याने १०० िकलो कांद्यामागे केवळ १२ ते १६ किलोपर्यंत बियाणे तयार झाले. दोन वर्षांपूर्वी कंपन्यांचे बियाणे विक्री झाले नाही त्यामुळे कंपन्याांना तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे कंपन्यांनी गतवर्षी बियाणे कमी प्रमाणात तयार केले. त्यामुळे कांद्याला दर मिळत असल्याने शेतकरी बियाणे तयार करण्यासाठी कांदा विक्री करीत नाही. त्यामुळे बियाण्याची टंचाई निर्माण झाल्याने दरात वाढ झाली.

एक्स्पर्ट व्ह्यू : खराब होत असलेला कांदा विक्रीला आणा, बाकी साठवा - डॉ. सतीश बोंडे, कांदा शास्त्रज्ञ
हवामानतज्ज्ञांनुसार डिसेंबर व जानेवारीपर्यंत पावसांचा अंदाज आहे. तसेच गारपिटीचीही शक्यता नाकारता येेत नाही. अति पावसानेे जमिनीत ओलावा वाढलाय. सूर्यप्रकाशही कमी आहे. परिणामी कांद्याची मुळं निष्क्रिय होत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होतोय. यामुळे कांद्याची फुगवण होत नसून वजनवाढीची समस्या निर्माण होते. पावसामुळे करपा, काळा करपा या राेगांचाही प्रादुर्भाव होत असल्याने जमिनीत कांद्याच्या कंदाभोवती आवरण वाढत नाही. या सर्व संकटामुळे यंदा बाजारात कांदा कमी प्रमाणात दाखल होईल. हे केवळ महाराष्ट्रातील झाले. इतर राज्यांत वातावरण चांगले राहिले तर तेथून कांद्याची अावक वाढली तर दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कांदा उत्पादकांनी खराब होत असलेला कांदा बाजारात विक्रीला आणावा. चांगल्या कांद्याची साठवण करून ठेवावी. दोन महिन्यांपर्यंत कांदा टिकण्याची क्षमता असल्याने भविष्यात त्याला चांगले दर मिळू शकतील असा विश्वास आहे.