आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगाराच्या संधी:सात हजार 560 जागांसाठी होणार स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भरती, तीन हजार 233 जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पदभरतीसाठी अनेक परीक्षा विहीत वेळेत होऊ शकल्या नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता आयोगातर्फे स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीसाठी आयोगाकडे ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत गट-अ, गट-ब, गट-क या संवर्गातील ७ हजार ५६० जागांच्या पद भरतीसाठी मागणीपत्र दाखल झाले आहे. त्यातील ४ हजार ३२७ पद भरतीसाठी जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या आहेत. आता उर्वरित ३ हजार २३३ जागांसाठी २०२२ या वर्षात जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. एमपीएससीतर्फे होणाऱ्या या मेगा भरतीचा फायदा अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांना होणार आहे.

राज्य शासनाच्या मागणीपत्रानुसार गट-अ च्या ३ हजार ११ तर गट ब च्या २६५८ आणि गट क च्या १८११ अशा एकूण ७ हजार ५६० प्राप्त पदसंख्या असून त्यातील गट-अ च्या १४९९, गट-ब च्या १२४५ तर गट-क च्या १५८३ अशा एकूण ४ हजार ३२७ पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातील काही पदांच्या भरतीसाठी परीक्षाही झाल्या आहेत. आता मागणीपत्रांपैकी जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून इतर संवर्ग, पदांसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील.

नवीन वर्षात अनेक संधी
अनेक महिन्यांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन वर्षात विविध संवर्गातील पदांच्या भरतीसाठी परीक्षा होणार असल्याने संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी आतापासून या परीक्षांच्या दृष्टीने नियमित अभ्यास केल्यास निश्चित यश मिळू शकेल. -प्रा. राम खैरनार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

या संवर्गातील पदांसाठी होणार मेगा भरती
सार्वजनिक आरोग्य विभाग (९३६), कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग (९२४), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (१९९), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (६२), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (१६), सामान्य प्रशासन विभाग (१०५७), मराठी भाषा विभाग (२१), आदिवासी विकास विभाग (७), बृहन्मुंबई महापालिका (२१), सार्वजनिक बांधकाम विभाग (१३), पर्यावरण विभाग (३), गृह विभाग (११५९), वित्त विभाग (३२१), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (१५७२), उच्च व तंत्रशिक्षण (३५), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (१०५), सहकार, पणन व वस्त्रोद्योग (३२), कौशल्य विकास व उद्योजकता (१७१), महसूल व वन विभाग (१०४) यासह ग्रामविकास, नगरविकास, मृद व जलसंधारण, जलसंपदा, विधी व न्याय व नियोजन विभाग या संवर्गातील पदांसाठी भरती होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...