आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात किमान तापमान 3 अंशांनी घसरले:विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; शेतकऱ्यांना दिलासा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेले काही दिवस तापमानात वाढ झाल्यानंतर आता राज्यभरात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. राज्यात किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे. दोन दिवसात पारा हळूहळू घसरत जाणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

निचांकी तापमान 12.4 अंश सेल्सिअस

आज धुळे येथे निचांकी तापमान 12.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. याशिवाय निफाड येथे 13 अंश सेल्सिअस, नाशिक येथे 14.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे आता थंडीचा कडाका वाढला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रावर होत असल्याने राज्यात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.

आकाश स्वच्छ, निरभ्र

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यभरात गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा 20 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत गेला. अशात गेल्या दोन दिवसांपासून आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यभरात कमाल तापमान हे 30 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. मात्र, आता तापमानात पुन्हा घसरण होत असून थंडी वाढताना दिसत आहे.

शेतकऱ्यांवरील संकट निवळले

नाशिक जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भात गत आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंता वाढली होती. तसेच नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्ष उत्पादकही चिंतातूर झाले होते. मात्र, वातावरण निवळल्याने शेतकरी संकटातून वाचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आज पासून किमान तापमानात घसरण होणार असल्याने थंडीचा कडाका राज्यात वाढणार आहे. यामध्ये विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्र मधील नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात थंडी अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला.

बातम्या आणखी आहेत...