आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:कोविड - महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील अवघ्या 6% कुटुंबांनाच; खासगी रुग्णालयांनी बेड्स नाकारल्याच्या तक्रारी

नाशिकएका महिन्यापूर्वीलेखक: दिप्ती राऊत
 • कॉपी लिंक
 • 2 कोटी लाभार्थींपैकी केवळ 10 लाख रुग्णांना मिळाले उपचार

महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांवर कोविडच्या खर्चाचा बोजा पडू नये या उद्देशाने शासकीय आणि योजनेतील अंगीकृत खासगी रुग्णालयात याअंतर्गत “कॅशलेस’ उपचार देणे यात अपेक्षित होते. प्रत्यक्षात राज्यातील एकूण कोविड रुग्णांपैकी फक्त ६% म्हणजे १० लाख रुग्णांनाच लाभ मिळाल्याचे पुढे येत आहे.

सध्या १ लाख ६० दाव्यांचा (क्लेम्स) निपटारा करण्याचे काम सुरू आहे. कोविड उपचारांचा खर्च गरीब, गरजू कुटुंबांना परवडत नसल्याच्या तक्रारी पहिल्याच लाटेपासून पुढे येत होत्या. त्यामुळे राज्यातील सर्वच नागरिकांसाठी ही योजना खुली करण्याचा निर्णय २३ मे २०२० रोजी आरोग्य खात्याने घेतला होता.

यांनाही लागू केली होती योजना

 • पिवळी, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा रेशनकार्डधारक कुटुंबे
 • राज्यातील दुष्काळी भागातील १४ जिल्हे
 • पांढरे रेशनकार्डधारक शेतकरी कुटुंबे
 • बांधकाम कामगार कल्याण महामंडळातील कुटुंबे
 • गरीब, गरजू कुटुंबांना कॅशलेस उपचार सुविधा

पात्र नसताना मोफत उपचारांची मागणी
ऑक्सिजनचा स्तर ९४ पेक्षा कमी असलेल्या रुग्णांनाच ही योजना लागू होती. त्या निकषात न बसणाऱ्यांना नाकारण्यात आले. तरीही १० लाख रुग्णांना कोविडचे मोफत उपचार देण्यात आले. १ लाख ६० हजार क्लेम्सची प्रक्रिया सुरू आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, सीईओ, राज्य आरोग्य हमी सोसायटी.

लाभार्थींची संख्या कमी, तक्रारीच अधिक
योजनेतील लाभार्थींना खासगी रुग्णालयांनी कोविडचे उपचार नाकारल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. उपचार नाकारल्यास हेल्पलाइन क्रमांक, तक्रार क्रमांक अशी कोणतीच सेवा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळाला नाही. - डॉ अभिजित मोरे, आरोग्य कार्यकर्ते, आप

इतर प्रश्नांच्या गदारोळात तक्रारींचा निपटारा कमी
खासगी रुग्णालये या योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेत नसल्याच्या, आगाऊ पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आले होते. मात्र, त्या वेळच्या परिस्थितीतील अन्य प्रश्नांच्या गदारोळात या तक्रारींचा निपटारा अल्प प्रमाणात होऊ शकला. कोविडच्या पार्श्वभूमीवर योजनेची व्याप्ती वाढवूनही एकूण रुग्णांपैकी फक्त ६ टक्के रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला.

 • १० लाख रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील कोविड लाभार्थींची संख्या
 • ६४ लाख १ हजार २१३, राज्यातील एकूण कोविड रुग्णांची संख्या
 • २ कोटी २३ लाख, देशातील सर्वाधिक पात्र कुटुंबे महाराष्ट्रात

याेजनेविषयी तक्रारी

 • खासगी रुग्णालयांनी बेड नाकारले
 • रुग्णालयांकडून पैशाची मागणी
 • अंगीकृत रुग्णालयांची यादीच नाही
 • हेल्पलाइन, तक्रार क्रमांक उपलब्ध नसल्याने नातेवाईक,रुग्णांची अडचण

शासनाच्या अटी अन् दावे

 • ऑक्सिजन स्तर ९४ पेक्षा कमी हवा
 • पात्र नसूनही मोफत उपचार मागणी
 • सेवा नाकारणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांची चौकशी सुरू
 • अनेकांनी अंगीकृत नसलेल्या रुग्णालयात घेतले उपचार
बातम्या आणखी आहेत...