आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज संघटनाच्या संपाचा परिणाम वीज पुरवठ्यावर झाला. पर्यायाने वीज खंडीत होत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच महावितरण कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक हा कायम बंद लागत असल्याने नागरिकांची संताप अनावर झाला होता. तर नाशिकरोड येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या आणि अदानी कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने वीज नियामक आयोगाकडे महावितरणच्या काही भागाची मागणी केली आहे. याविरोधात महावितरण, महापारिषेण व महानिर्मिती या कंपन्याच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाची भिती व्यक्त करुन बुधवारी (दि.४) संपाचे अस्त्र बाहेर काढले होते. त्यासाठी बुधवारी सकाळपासुन संपुर्ण राज्यात वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे शहरात सकाळपासुन विविध भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.
राज्य शासनाच्या सरकारी वीज कंपन्याच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी विविध वीज कामगार संघटनांनी बुधवारपासुन ७२ तासांचा संप पुकारला होता, संपाला सर्व कर्मचाऱ्यांनी पाठींबा दिल्याने संप यशस्वी झाला. मात्र, संपादरम्यान वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नाशिककरांना मोठा त्रास सहन करावा लागला.
इंटरनेट सेवाही विस्कळीत
वीज नसल्याने इंटरनेटसेवाही विस्कळीत झाली. आज नाशिकमध्ये कर्मचारी संघटनांनी एकलहरे औष्णिक वीज केंद्र येथेही संप करीत घोषणाबाजी करीत निर्दशने केली. नाशिक येथे या संपात राज्य वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी संघर्ष समिती, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लोयीज फेडरेशन, भारतीय महिला फेडरेशन व कामगार एकता कमिटी, वर्कर्स फेडरेशन, स्वतंत्र बहुजन कर्मचारी संघटना, तांत्रिक संघटना, एसईए, वीज तांत्रिक संघटना, बहुजन फोरम, कामगार महासंघ, कामगार सेना, आपरेटर संघटनांनी निदर्शनात सहभाग घेतला होता. यावेळी व्ही.डी.धनवटे, पंडीतराव कुमावत, प्रशांत शेंडे, महेश कदम, विनोद भालेराव, आर. जी. देवरे, सुधीर गोरे, ईश्वर गवळी, दिपक गांगुर्डे, दिपा मोगल, कांचन जाधव, जे. वाय. पांढरे, किरण जाधव, के. वाय. बागड, चंद्रकांत आहिरे, किरण मिठे, संजय पवार, हर्षल काटे, सुनिल पाटील, रितेश पिल्ले, राजेश बडनखे आदी उपस्थित होते.
गतवर्षी मार्चमध्येही दोन दिवस संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी कामगार व युनियन पदाधिका-यांनी एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील फिडर बंद केले होते. त्यावेळी वीज केंद्रात तांत्रिक बिघाड झाला होता. आता होणा-या संपात असा प्रकार घडल्यास वीज संच बंद पडून वीज पुरवठा खंडीत होऊ नये, संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचून जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सिध्देश्वर धुमाळ यांनी संघटनांना एकलहरे आस्थापनेच्या आवारात व दोनशे मीटर परिघात व्दारसभा, धरणे आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने करण्यास मनाई केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.