आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमिनीच्या हिसा नमुना 12 मधील चुक दुरुस्त करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागत त्यापैकी 50 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील उपसंचालक तथा जिल्हा अधिक्षक व कनिष्ठ लिपीकासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. महेशकुमार महादेव शिंदे (50, रा. पंडित कॉलनी) असे अधीक्षकाचे नाव असून अमोल भीमराव महाजन असे कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. दोघांना न्यायालयाने एक दिवसांची कोठडी सुनावली आहे.
महेशकुमार शिंदे याच्याकडे भूमि अभिलेख विभागाचा उत्तर महाराष्ट्र उपसंचालक अतिरीक्त कार्यभार असून जिल्हा अधीक्षक पदाचाही पदभार आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतजमीनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12मध्ये चुक होती. या चुकीमुळे जमीनीचा व्यवहार करता येत नसल्याने चुक दुरुस्तीसाठी त्यांनी भूमि अभिलेख कार्यालयात संपर्क केला. गेल्या अकरा महिन्यांपासून तक्रारदार नियमीत पाठपुरावा करत असतानाही त्यांचे काम होत नव्हते. कार्यालयातील कनिष्ठ लिपीक महाजन याने तक्रारदारास पैसे दिल्यांशिवाय काम होणार नाही असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराकडे शिंदेने एक लाखाची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने शहानिशा करीत सापळा रचला. मंगळवारी (दि.31) रात्री सीबीएस येथील भूमि अभिलेखच्या कार्यालयातच लाचेचे 50 हजार रुपये स्विकारताना पथकाने शिंदे यास पकडले. तर महाजनला अटक केली. दोघांविराेधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यांना बुधवारी (दि.1) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची कोठडी सुनावली आहे.
घरझडतीसह चौकशी
लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिंदेच्या निवासस्थानाची झडती घेतली. घरझडतीत तीन लाख रुपये रोख व सुमारे साडेतीन लाखांचे सोने पथकास मिळाले. कागदपत्रांच्या आधारे शिंदेच्या इतर मालमत्तेचेही चौकशी सुरु आहे. साडेतीन वर्षांपासून शिंदे नाशिकमध्ये कार्यरत असून, गैरव्यवहारांबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत.
एसीबी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर म्हणाल्या, भूमि अभिलेख मधील लाच प्रकरणात तपास सुरु आहे. यासंदर्भात तक्रारदारांनी विभागास माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला कठोर कारवाई करता येईल. तक्रारदारांची ओळख गोपनीय राहिल. त्याचप्रमाणे लाचखोरांची तक्रार केल्यास त्रास होतो, हा चुकीचा गैरसमज आहे. तुमचे खोळंबलेले कायदेशीर काम आम्ही पुर्ण करू, त्यासाठी तक्रारदाराने न घाबरता 1064 या क्रमांकावर किंवा विभागाकडे तक्रार करावी. संबंधित लाचखोरांवर निश्चित कारवाई करण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.