आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक कोरोना:उपाशीपोटी रात्रभर रस्त्यावर, तरीही सकाळी 7 ला कोरोना वार्डमध्ये कर्तव्यावर हजर; मालेगावी कोरोनायोध्या परिचारिकांची हेळसांड

 नाशिक2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

संदीप जाधव

मालेगावमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा कमी पडत असल्याने   जिल्ह्यातील इतर ठिकाणांहून परिचारिकांना   पाचारण करण्यात आले. मात्र, येथे ना राहण्याची नीट  सोय, ना जेवणाची व्यवस्था. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना एकाच खोलीत जागा देत प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडल्याचे सोपस्कार पूर्ण केले खरे. मात्र, या सैनिकांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडून प्रशासनाने आपली हतबलता सिद्ध केली.  उपाशीपोटी रात्र रस्त्यावर काढून या प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला प्राधान्य देत सकाळी सात वाजताच उठून कोरोनाशी लढा देण्यास हे योद्धे सज्ज झाले. या कठीण प्रसंगी पळून न जाता आरोग्यसेवेचे व्रत पूर्ण करण्यासाठी जीवाची पर्वा न करता आरोग्यसेवेचा कणा असलेल्या परिचारिकांशी ‘दिव्य मराठी’ने  संवाद साधला. परीचारी व कर्मचाऱ्यांची  संपर्क आपबिती त्यांच्याच शब्दांत...

मालेगावी कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अतिरिक्त कर्मचारी व परिचारिका म्हणून मालेगावी तत्काळ जावे लागणार असल्याची ऑर्डर सकाळीच मिळाली. वार्डमध्ये कर्तव्य बजावत असताना तत्काळ घरी गेलो. आठ दिवस मुक्कामी राहावे लागणार असल्याने कपडे घेऊन घर सोडले. दुपारी १२ वाजता वाहनातून निघालो. दोन वाजता मालेगावी हजार झालो. मात्र, येथे प्रशासनाकडून काहीच नियोजन नव्हते. सायंकाळी ४ वाजता हजर झाल्याची माहिती दिली. तरी देखील दखल घेतली गेली नाही. सायंकाळी सात वाजता मालेगाव रुग्णालय प्रशासनाने एक अधिकारी पाठवला. नावे लिहून घेत तो निघून गेला. महिलांना नैसर्गिक विधी करण्यासाठी देखील सोय नव्हती. रात्री १० वाजता  आणखी  अधिकारी आले. आदिवासी मुलींच्या बंद असलेल्या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगत ते ही निघून गेले. रात्री २ वाजेपर्यंत प्रशासनाकडून हेळसांड सुरू होती. भूक लागून देखील उपाशीपोटी वसतिगृहाच्या रस्त्यावरच बिछाना टाकून अंग टाकले. तीन वाजता वसतिगृह उघडले. मात्र, आतील परिस्थिती बघून आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले. महिलांच्या बाथरूमला दरवाजे नाही, पलंगावर धूळ, जाळे. अखेर सर्व महिलांनी एक खोली स्वच्छ करून तेथेच तीन तास आराम केला. सकाळी सात वाजता उठून कर्तव्यावर हजर झालो. आमच्यावर किती पण संकट असले तरी  रुग्णसेवेचं व्रत आणि घेतलेली शपथ आठवत  सेवेला प्राधान्य दिले. आता आठ दिवस मुक्कामी राहून रुग्णसेवा देणार असल्याने प्रशासनाने किमान परिचारिकांच्या थोड्या जरी अडचणी समजून घेतल्या तरी आम्ही जीवाची पर्वा न करता सेवेसाठी कायम तत्पर राहू अशी भावना एका परिचारिकेन वक्त करत जड  अंत:करणाने फोन ठेवत, तुम्ही आमची दाखल घेतली त्याबद्दल आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...