आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड:मराठवाडा व खान्देशला जोडणारे मनमाड होणार प्रमुख ‘रस्ता जंक्शन’

मनमाडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदगाव ते पानेवाडी १३.६१५ किमी दुपदरीसाठी

महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन स्टेशनबरोबरच मनमाड शहर हे लवकरच नाशिक, जळगाव, धुळे, नगर, औरंगाबाद या पाचही जिल्ह्यांना चौपदरी व काही ठिकाणी दुपदरी रस्ता राष्ट्रीय महामार्गाने जोडले जाणारे व उत्तर महाराष्ट्राशी मराठवाडा-खान्देश भागाला जोडणारे महत्त्वाचे ‘रस्ता जंक्शन’ही बनणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जळगाव-नांदगाव-मनमाडच्या रस्ते कामासाठी केंद्रातर्फे १ एप्रिलला २५२ कोटी रुपये मंजूर झाले. या भागाच्या विकासाचा ‘रस्ता राजमार्ग’ खुला होणार आहे. आयओसी, बीपीसीएल, एचपी या इंधन प्रकल्पांच्या टँकर्स वाहतुकीसाठी सध्या काही वर्षांपासून मनमाड राज्याच्या वाहतूक नकाशावर झळकत आहे.

शिर्डी व भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या शीख धर्मीयांच्या पवित्र गुरुद्वाराबरोबरच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या एफसीआय धान्य साठवणूक केंद्राच्या वाहतुकीसाठी मनमाडला रस्ता व रेल्वे वाहतुकीसाठी उत्तर महाराष्ट्रात अग्रस्थान होते. आता या नव्या उपलब्धीमुळे वाहतुकीचा वेग वाढून वेळेत व पर्यायाने इंधनातही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. नांदगाव-मनमाड रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी १ एप्रिल रोजी घोषणा करत २५२ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली. हे काम झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ७५३ जे चे पूर्ण १६९ किमी लांबीचे काम पूर्ण होईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र (खान्देश विभाग) हा शहादा-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग ७५३ जी ला मनमाड येथे मिळेल. मनमाडपासून चांदवडपर्यंतच्या २३ किमी लांबीच्या रस्त्याचे काम सध्या महाराष्ट्र रस्ते विभाग महामंडळामार्फत प्रगतीत असल्याने चांदवड येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता मिळेल. जळगाव-पाचोरा-भडगाव-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ जे सां. क्र. १४७/४२५ ते ४६८/८०० या लांबीमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे ही कामे (ईपीसी) तत्त्वावर केली जाणार अाहेत. याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना फायदा होणार आहे.

नांदगाव ते पानेवाडी १३.६१५ किमी दुपदरीसाठी
सदर मंजूर प्रकल्पांतर्गत नांदगाव ते मनमाड या रस्त्याचा समावेश असल्याचे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले. या प्रकल्पाची एकूण लांबी २१.३७५ किमी आहे. त्यातील नांदगाव ते पानेवाडी याची १३.६९५ किमी दुपदरीसाठी असेल. उर्वरित पानेवाडी ते मनमाड ही ७.७१ किमी लांबी चौपदरी अशी एकूण २५ मीटर रुंदीसाठी आहे. या रस्ता लांबीत रस्त्याच्या दुतर्फा पथदीप, हायमास्ट, बस थांबे इत्यादींची तरतूद गृहित धरण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...