आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाचा केंद्रबिंदू नाशिकच:गुप्त बैठकांनंतर संभाजीराजे आज जाहीर करणार भूमिका; शरद पवार-मुख्यमंत्री यांच्यात चर्चा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षणासाठी सामुदायिक नेतृत्वाची गरज : राधाकृष्ण विखे

खासदार छत्रपती संभाजीराजे भाेसले १८ व १९ मे राेजी नाशिक दाैऱ्यावर येऊन गेल्यानंतर पाठाेपाठ अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हेदेखील मंगळवारी (दि. २५) नाशिक दाैऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी नाशिकमध्ये तळ ठाेकून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका घेत चर्चा केली. अाज गुरुवारी (दि. २७) ते अारक्षणासंदर्भात मराठा क्रांती माेर्चाच्या अांदाेलनाची भूमिका स्पष्ट करणार अाहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते.

मात्र, नाशिक दाैऱ्याप्रसंगी त्यांनी २७ तारखेला अांदाेलनाची दिशा ठरवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी दाैरे करून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा नाशिकलाच तळ ठाेकून आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती अाखली अाहे. यापूर्वी झालेल्या मराठा क्रांती माेर्चाच्या वेगवेगळ्या अांदाेलनांत नाशिकची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे गनिमी काव्याची रणनीती नाशिकमधूनच ठरणार असल्याचे स्पष्ट हाेत अाहे. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नाशिककरांवर जबाबदारी दिल्यास ती नक्कीच यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे सांगितले.

समाजात गट-तट असले तरी उद्देश एकच
मराठा हा महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज असल्याने गट-तट साहजिक आहेत. तरी लढ्याची दिशा मात्र एकच आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक तथा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या वडिलांच्या निधनामुळे पाटील यांनी गायकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मराठा आरक्षणासाठी सामुदायिक नेतृत्वाची गरज : राधाकृष्ण विखे
आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व मराठा संघटनांनी सामुदायिक नेतृत्वात एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन भाजपचे माजी मंत्री व विद्यमान अामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी नाशिक येथे केले. राज्य सरकारचा निष्काळजीपणा आणि मंत्र्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे कोर्टात न्याय मिळाला नसल्याचे ते म्हणाले. खा. संभाजीराजे यांनी या मुद्द्यावर सुरू केलेले दौरे व बैठकांविषयी छेडले असता, आपला त्यांना विरोध नाही; परंतु या आंदोलनासाठी “सामुदायिक’ नेतृत्वाची गरज आहे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यातील २६ संघटना लढत आहेत. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांची संख्या ६५ हून अधिक झाली आहे. हा राजकीय नाही तर मराठा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले.

पक्षातीत की पक्षाच्या वतीने?

  • हे आवाहन भाजपच्या वतीने नव्हे, तर पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून करत आहे, असे विखे म्हणाले.
  • पंतप्रधानांनी भेट नाकारल्याने खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या उद्विग्नतेनंतर भाजपच्या वतीने विखेंकडे ही जबाबदारी सोपवल्याचे बोलले जाते.

शरद पवार-मुख्यमंत्री यांच्यात चर्चा

मुंबई | मराठा आरक्षण आणि पदोन्नती आरक्षणप्रश्नी झालेली कोंडी पाहता शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंत बुधवारी चर्चा झाली. याची अधिकृत माहिती सरकारने दिलेली नाही. मराठा आरक्षणावर भाजप आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच खा. संभाजीराजेंचे दौरे व भाजप आमदार विनायक मेटे यांची मोर्चाची घोषणा पाहता ही भेट असल्याचे मानले जाते.

... म्हणून पवार मैदानात
मराठा आरक्षण व पदोन्नती आरक्षण प्रकरणी मराठा व दलित यांना एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्यात विरोधी पक्षाचे नेते यशस्वी झाल्यास त्याचा फटका सत्ताधारी तिन्ही पक्षांना बसणार आहे. म्हणूनच शरद पवार तत्काळ या राजकीय मैदानात उतरले असल्याचे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...