आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगी कंपन्यांद्वारे सुरू असलेल्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांनंतर चौकशा, तपासण्या, कारवाया होऊनही ब्लॅकलिस्टेड कंपन्यांतर्फे पेपरफुटीचे प्रकार सुरूच आहेत. यावर आता आरोग्य विभागाचे आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. रामास्वामी यांनी टीका केली आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करून कोणत्याही खासगी कंपनीला ठेका न देता एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राबवावी, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनास पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.
या पेपरफुटीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. सतत होत असलेल्या पेपरफुटीच्या गुन्ह्यांचा सायबर सेलद्वारे तपास सुरू आहे. वारंवार नवीन घोळ बाहेर येेत आहेत. ही भरती प्रक्रियाच रद्द करावी, असा अहवाल शासनाला पाठवला असून निर्णय घेणे शासनाच्या हाती आहे, असे रामास्वामी म्हणाले. वादग्रस्त कंपन्यांना परीक्षांचा ठेका का दिला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राजेश टोपेंच्या राजीनाम्याची भाजपची मागणी
आरोग्य विभागातील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने या गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्यमंत्र्यांवर आली आहे. ही परीक्षा देणाऱ्या सुमारे १० लाख उमेदवारांचे नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नाही. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली.
आराेग्य विभागाचा ‘ड’ साेबतच ‘क’ वर्ग परीक्षेचाही पेपर फुटला : सहसंचालक महेश बाेटलेची पाेलिसांसमाेर कबुली
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या आराेग्य विभागामार्फत राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘ड’ गटाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पाेलिस तपासादरम्यान आराेग्य विभागाच्या ‘क’ गटाच्या परीक्षेचा पेपर ही फाेडल्याची कबुली या कटातील मुख्य सूत्रधार आराेग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचे सहसंचालक महेश सत्यवान बाेटले (५१) यांनी तपास यंत्रणांना आहे.
महेश बाेटले याच्याकडे आराेग्य विभागाची राष्ट्रीय आराेग्य अभियान, मुंबई तांत्रिक सहसंचालक म्हणून जबाबदारी आहे. आराेग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या गट ‘क’ व ‘ड’ पद भरती प्रक्रियेत लेखी परिक्षेचा पेपर सेट करणाऱ्या समितीत त्याची नियुक्ती हाेती. यादरम्यान २४ आॅक्टाेबर राेजी गट ‘क’ची परीक्षा तर ३१ आॅक्टाेबर राेजी गट ‘ड’ पदाची लेखी परीक्षा हाेणार हाेती. परंतु दाेन्ही परीक्षेचे पेपर सेट झाल्यानंतर त्याने परीक्षा हाेण्यापूर्वीच एक महिना आधी म्हणजे २४ सप्टेंबर राेजी परीक्षेचा पेपर लातूरचा सार्वजनिक आराेग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (५०) यांना दिला. या बदल्यात परीक्षार्थीकडून बडगिरे याने स्वीकारलेल्या रकमेतून अर्धी रक्कम त्याच्या वाट्यास येणार हाेती.
सुरुवातीला १५ ते २० विद्यार्थ्यांनाच परीक्षेचा पेपर देऊन रक्कम स्वीकारण्याचे ठरले हाेते. परंतु पैशांच्या माेहापायी एजंटच्या माध्यमातून पेपर अनेक जणांपर्यंत पाेहचला गेला आणि बिंग फुटले. बाेटलेच्या कार्यालयातून पाेलिसांनी त्याचा माेबाइल, लॅपटाॅप, संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सीसीटीव्ही स्टाेरेजसह डीव्हीआर जप्त केला असून पाेलिसांना त्यात डिजीटल पुरावेही सापडले आहेत. आराेग्य विभागातील इतर काेणकाेणत्या पदांच्या भरती परीक्षेकरिता बनवलेला लेखी पेपर सेट करणाऱ्या समितीत बाेटले सहभागी हाेता, तसेच इतर काेणती जबाबदारी त्याच्यावर हाेती. त्या दरम्यान त्याने फायद्याकरिता किती प्रकरणात उपयाेग केला याबाबतचा तपास पुणे सायबर गुन्हे शाखा करत आहे.
आणखी दाेन आराेपी जेरबंद : सायबर पाेलिसांकडे याबाबत तक्रार आल्यानंतर पाेलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, निरीक्षक डी. एस. हाके यांनी सखाेल तपास करत एकूण १४ आराेपींना जेरबंद केले आहे. शुक्रवारी नामदेव विक्रम करांडे (३३, रा.बीड) व उमेश वसंत माेहिते (२४, रा.काेताळ, ता.उमरगा, उस्मानाबाद) या दाेन आराेपींना पुणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १३ डिसेंबर पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. सदर दाेघांना लातूरचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याच्याकडून पेपर मिळालेला हाेता व त्यांनी बडगिरे यास काही रक्कम देऊन ताे इतर विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचवून पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.