आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील २७ % कोविड केअर सेंटर्समधील वीज जोडणी यंत्रणा “धोकादायक’ श्रेणीत, तर ९% सेंटर्स “अति जोखमी’च्या श्रेणीत आल्यानंतरही त्यात दुरुस्त्या करण्याचे काम झाले नसल्याची धक्कादायक माहिती “दिव्य मराठी’च्या हाती लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील आयसीयूतील आगीत ११ बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यावर राज्याच्या विद्युत निरीक्षण विभागातर्फे ३,८५० कोविड केअर सेंटर्सचे हे इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात आले होते.
कोविड केअर सेंटर्सला लागलेल्या आगीनंतर फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट अशा दोन प्रकारची तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार विद्युत निरीक्षक विभागाच्या वतीने तातडीची पावले उचलून शासकीय तसेच खासगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर्समधील विद्युत जोडणी संचांच्या तपासण्या करण्यात आल्या.
त्यात २,६४० कोविड केअर सेंटर्स खासगी रुग्णालयांतर्फे चालवण्यात येत होते, तर १,२१० शासकीय रुग्णालयातील कोविड केअर सेंटर्स होते. त्यातील तब्बल ३६% कोविड केअर सेंटर्समधील विद्युत जोडणी “अति धोकादायक’ आणि “धोकादायक’ श्रेणीतील असल्याचे त्यातून पुढे आले. त्यानुसार संबंधित विभागाच्या जिल्हा कार्यालयांमधून संबंधित कोविड केअर रुग्णालयांना त्यांच्या विद्युत जोडणीतील धोके व त्रुटी लेखी कळवण्यात आल्या होत्या. मात्र, एक वर्ष उलटून गेले तरी त्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
सदर तपासणीत औरंगाबाद जिल्ह्यातील एकाही शासकीय कोविड रुग्णालयातील विद्युत जोडणी “सुरक्षित’ असल्याचे दिसले नाही. येथील ६५ रुग्णालयांचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात आले. त्यापैकी ४३ खासगी कोविड सेंटर्समधील विद्युत जोडणी धोकादायक, अति धोकादायक आहे, तर १२ शासकीय कोविड सेंटर्समधील ऑडिट रिपोर्ट “अति धोकादायक’ असल्याचे तपासणीत पुढे आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.