आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा सवाल:अचानक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कसा; हे जितकं वाटतं, तितकं सोपं नाही - राज ठाकरे

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अचानक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कसा आला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. हे जितकं वाटतं, तितकं सोपं नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले.

राज ठाकरे यांना पत्रकारांनी ओबीसी आरक्षाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय आला कसा. हे जितकं वाटतं, तितकं सोपं नाही, कोण कोर्टात गेले, का गेले, हे समजून घ्यायला हवे. जातीपातीतून बाहेर येत नाही, तोपर्यंत हे असेच सुरू राहणार. मुख्य प्रश्न बाजूला राहतात. अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली अजून तरी कळले आहे का? गाडी ठेवणाऱ्याचा हेतू कळालेला नाही. मात्र तरी देखील देशमुख तुरुंगात आहेत. असे राज ठाकरे म्हणाले.

... हे देशासाठी चांगले नाही

पुढे राज ठाकरे म्हणाले की, 5 लाख लोकांनी भारत देश सोडला आहे. हे लक्षण चांगले नाही. मात्र, हा सगळा नोटाबंदी आणि कोरोनाचा फटका आहे. अनेक व्यावसायिक हे देश सोडून विदेशात जात आहेत. हे देशासाठी चांगली बातमी नाही. याचा लाखो नोकऱ्यांवर परिणाम होतो आहे आणि आपण आर्यन आणि सुशांतवर वेळ वाया घालतोय, अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

तुमचा सोर्स मला समजत नाही
पत्रकारांनी भाजप मनसे युतीबद्दल राज यांना विचारले असता ते म्हणाले की, या युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील, पण त्या चर्चांच मला माहित नाहीत. मात्र, मनसेने केलेले नाशिकमधील काम नाशिकरांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

देशात आफ्रिकनांचे राज्य का?

राहुल गांधी यांनी देशात हिंदूंचे राज्य नाही. हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, असे म्हटले होते, त्यावर देखील राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले की, मग काय आता देशात आफ्रिकन लोक राज्य करताय का? बिपीन रावत यांच्या अपघातावर अनेक जण संशय घेत आहेत. आपण हा घात-पात आहे असे समजले तरी ते बाहेर येणार आहे का? असा सवालही त्यांनी केला. आपल्या देशात प्रश्न उपस्थित होतात. मात्र, त्यांची उत्तरे मिळत नाहीत. असे राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...