आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अभिजात मराठी’साठी पंतप्रधांना भेटू द्या:'मसाप'ने मागणीवजा विनंती करताच देवेंद्र फडणवीसांनी लवकरच भेट घडवण्याचे दिले आश्वासन

पीयूष नाशिककर|महात्मा गांधी साहित्य संमेलन नगरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले. मात्र अद्यापही त्याचे पुढे काहीच हाेत नसल्याने वर्धा येथे सुरू असलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कार्याध्यक्ष मिलिंद जाेशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या भेटीसाठी घेऊन जाण्याची विनंती त्यांनी फडणवीस यांना केली.

'मसाप'कडून फडणवीसांना निवेदन

महात्मा गांधी साहित्यनगरीत तिसऱ्या दिवसाच्या शुभारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी प्रा. जाेशी यांनी फडणवीस यांची भेट घेत मसापतर्फे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोकर उभी केली. पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्रे पाठवली आहेत. साहित्यिकांच्या बैठका, त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी अशा अनेक गोष्टी केल्या.

अद्याप अभिजात दर्जा नाही

राजधानी दिल्लीतही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आवाज उठविल्याचे ते पत्रात म्हणाले. मात्र, आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होऊनही अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तो मिळणे ही मराठी माणसांसाठी अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ आपण पंतप्रधानांच्या भेटीसाठी घेऊन जावे, अशी विनंती प्रा. जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली.

मसापकडून त्या आश्वासनाची आठवण

''बडोद्याच्या 91 व्या साहित्य संमेलनात फडणवीस यांनी ‘अभिजात भाषेबाबत पंतप्रधानांची भेट घडवून आणू’, असे आश्‍वासन साहित्यिकांना दिले होते. या आश्‍वासनाचे स्मरण म्हणून यांची आज भेट घेतली. पंतप्रधानांशी लवकरच भेट घडवून देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.'' -प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.

बातम्या आणखी आहेत...