आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांमध्ये नात्याने संस्कार रूजवावे, यासाठी सायखेड्याजवळील गोदानगर येथील प्राथमिक शाळेत मातृ-पितृपूजन उपक्रम राबविण्यात आला. गोदानगर येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर विद्यार्थी-पालक- शिक्षक असा त्रिवेणी संगम आवश्यक असतो. ही बाब शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापक नवनाथ सुडके यांनी सहकारी शिक्षक आणि योग प्रशिक्षक ज्ञानेश्वर कुटे यांच्याकडे व्यक्त केली. या उपक्रमासाठी कुटे यांनी १०० हार, फुले, मिठाई आदी साहित्य स्वखर्चाने दिले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच या विद्यार्थ्यांवर बालपणी केलेले संस्कार चिरकाल टिकतात म्हणून आजच्या बालकांना आणि तरुण पिढीला उत्तम संस्काराची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळेत माता-पितापूजन दिवस साजरा करण्याची संकल्पना मुख्याध्यापक नवनाथ सुडके यांनी मांडली. गोदानगर येथे सर्व मजूर पालक आहे. विद्यार्थ्यांचे आई-वडील शाळेत आल्यानंतर सर्व पालकांना स्वतःच्या मुला -मुलींसमाेर बसवून भारतीय संस्कृतीप्रमाणे आई व वडिलांची पूजा विद्यार्थ्यांनी केली.
त्यानंतर सर्व मुलांची पूजा आई-वडिलांनी केली. मुले आणि आई-वडील यांनी एकमेकांना मिठाई भरवत आणि मिठी मारत हा उपक्रम साजरा करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील हयात नाहीत किंवा काही कामानिमित्ताने अनुपस्थित होते. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मिता लांडे-सुडके , ताईबाई कोकाटे, सोमनाथ महालपुरे हे स्वतः पूजनासाठी बसले आणि या उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे नियाेजन ज्ञानेश्वर कुटे आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी यांनी केले. सदरच्या उपक्रमास सायखेड्याचे सरपंच गणेश कातकाडे यांनी भेट देऊन गोदानगर शाळेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासित केले. उपसरपंच माणिक वाघ, सदस्य शोभा डंबाळे यांनी यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. स्मिता लांडे-सुडके यांनी आभार मानले. याप्रसंगी जालिंदर गांगुर्डे, सतीश वाघ, बंडू गायकवाड, धनेश पवार, कैलास मोहिते, सुनील पवार,शंकर वाघ, माया पवार, वंदना डंबाळे आदी सदस्य उपस्थित होते. मातृ-पितृपूजनाचे परिसरातील पालक, ग्रामस्थ यांच्यासह गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख प्रदीप कुटे यांनी कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.