आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेतून गृह व वाहनकर्ज घेताना आता जामीनदार देण्याची आवश्यकता नसल्याची घोषणा अध्यक्ष वसंत गिते यांनी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. तसेच सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
नामको बॅंकेची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. 29) मुख्य प्रशासकीय कार्यालयात झाली. गेल्या आर्थिक वर्षात बॅंकेला 29 कोटींचा निव्वळ नफा झाला असून, नफ्यात 88 टक्के, ठेवींमध्ये 6.14 टक्के, कर्जांमध्ये 11.33 टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ऐनवेळच्या विषयांमध्ये एका सभासदाने बॅंकेची कर्जप्रक्रिया क्लिष्ट असून, ती सुटसुटीत करावी, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना गिते यांनी बॅंकेकडून गृह व वाहनकर्ज घेणाऱ्यांना यापुढे जामीनदार द्यावा लागणार नसल्याचे जाहीर केले. बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेकडून झालेल्या 50 लाखांच्या दंडाचे संचालक हेमंत धात्रक यांनी स्पष्टीकरण दिले व संबंधित त्रुटी मागेच सुधारण्यात आल्याचे असल्याचे सांगितले.
बँकेचे उपाध्यक्ष अशोक सोनजे, हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी, प्रकाश दायमा, शिवदास डागा आदींसह संचालक उपस्थित होते. जनसंपर्क संचालक रंजन ठाकरे यांनी आभार मानले.
सभासदांनी मांडल्या या तक्रारी
कर्ज खाती बंद करताना बॅंकेकडून‘सिबिल’ला अहवाल पाठवला जात नाही. त्याचा सिबिल अहवालावर परिणाम होत असून, याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार एका सभासदाने केली. त्यावर याबाबत योग्य कार्यवाहीचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित यांनी दिले. याशिवाय चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे शाखा सुरू करावी, बॅंकेने स्वत:चे पेमेंट अॅप सुरू करावे आणि पासबुक प्रिंटिंग यंत्रणेत सुधारणा करावी, पासबुकवर आयएफएससी कोड प्रकाशित करावा आदी सूचना सभासदांकडून करण्यात आल्या.
पेटीएम साेबत बॅंकेचा करार
बॅंकेचे मोबाइल अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच पेटीएमशी करार करण्यात आला असून, त्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. येत्या दीड महिन्यात ही यंत्रणा सुरू होणार असून, बॅंकेचा स्वत:चा क्यूआर कोडही असेल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.