आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउल्का वर्षाव ही घटना खगोल प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची घटना मानली जाते. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर (बुधवारी, १४ डिसेंबरच्या पहाटे) खगोल-आकाशप्रेमींना मिथुन राशीतून होणारा जेमिनीड्स उल्कावर्षाव (मीटिओर शॉवर) पाहता येणार असल्याचे खगोल अभ्यासक सुदर्शन ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले.
मात्र, मिथुन (जेमीनिड) राशीतील उल्कावर्षावाचा स्रोत हा ‘३२०० फेथन’ नावाचा लघुग्रह आहे. दरवर्षी या लघुग्रहाचे कण ४ ते १७ डिसेंबर या काळात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. १३-१४ डिसेंबरच्या रात्री त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. लघुग्रहाचे कण हे धूमकेतूच्या शेपटीतील धूलिकणांपेक्षा आकाराने मोठे असल्यामुळे या उल्का अधिक तेजस्वी दिसतात. १४ डिसेंबरच्या पहाटे २ ते ४ या दरम्यान उल्कापात शिखरांवर राहील, असे अमेरिकेच्या नासा संस्थेने म्हटले आहे. उल्कावर्षाव हा धूमकेतूंमुळे दिसतो. जेव्हा धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून जातो, तेव्हा तो आपल्या मागे वायू आणि धूळ सोडत जातो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या धुळीच्या मार्गातून जाते तेव्हा ही धूळ (खडक, धातू, वायू, बर्फ इत्यादी) पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचली जाते. या उल्का सरासरी ताशी ५० हजार किमीच्या गतीने वातावरणातून प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर हे खडक घर्षणामुळे जळायला सुरुवात होते आणि सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते. बहुतेक उल्का या आकाशात जळून जातात.
दुर्बिण न वापरणेच याेग्य मंगळवारी (दि. १३) रात्री मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात होणाऱ्या या उल्कावर्षावाचे साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येईल. ताशी सुमारे १००-१५० उल्का पडताना दिसतील. उल्का पाहण्यास दुर्बीण वापरता येत नाही. द्विनेत्री (बायनाक्युलर) पण तितकी सोयीची नाही. उल्का निरीक्षण केवळ साध्या डोळ्याने याेग्य आहे. शहरापासून दूर, जिथे वीजेच्या दिव्यांचा प्रकाश नसेल तिथेच जाऊन निरीक्षण केलेले उत्तम. शहरातून उल्का निरीक्षण करण्यासाठी उंच इमारतीच्या वर जिथून चारही दिशेने क्षितिज दिसेल अशा ठिकाणी जावे, असे सुदर्शन गुप्ता म्हणाले. मध्यरात्री पूर्व दिशेला हा उल्कावर्षाव पाहता येईल. १४ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास उल्कावर्षाव पश्चिमेकडे दिसेल. मध्यरात्रीनंतर उल्कांची संख्या वाढते, अशीही माहिती त्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.