आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणांत जुंपली:हवामान विभाग 27 मिमी; पालिका म्हणते 75 मिमी ; गुरुवारी शहराला पावसाचा तडाखा

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाही अवघ्या तासा-दोन तासाच्या पावसामध्ये शहरांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार सुरूच असून गुरुवारी सायंकाळी अवघ्या दीड तासाच्या पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्याला महापालिकेने पावसाला जबाबदार ठरवले आहे. एकीकडे हवामान विभागाने २७ मिमी पाऊस झाल्याचा दावा केला असताना त्यावर कुरघोडी करत पालिकेच्या बांधकाम विभागाने ७५ मिमी पाऊस झाल्यामुळे पावसाळी गटार योजनेच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी जमा होऊन त्याचा निचरा होऊ शकला नाही, असा अजब दावा केला आहे.

गुरूवारी (दि. ४) सायंकाळी अवघ्या एका तासाच्या पावसात शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. पालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनसमोर गुडघ्याइतके पाणी साचले होते. त्याचप्रमाणे गडकरी चाैक, पिनॅकल मॉल, सारडा सर्कल, मायकाे सर्कल, रामायण निवासस्थान, पोलिस आयुक्तालय रोड, चिंचबन यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे पालिका पावसाळापूर्व चेंबर्स, नाले तसेच पावसाळी गटार योजनेच्या पाईपलाईनची कागदोपत्री सफाई करते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. यापूर्वी नालेसफाईमध्ये कोट्यवधी रुपयांचा हात मारण्याचे प्रकार घडले असल्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाविषयी संशयाचे धुके गडद झाले आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याच्या अहवालानुसार अवघा २७ मिमी पाऊस झाला असताना शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी मात्र ७५ मिमी पाऊस झाल्यामुळे पाणी तुंबल्याचा दावा केला आहे. पावसाळी गटार योजनेद्वारे प्रतितास २७ मिमी इतके प्रमाण असणाऱ्या पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी शहरातील खोलगट भागांमध्ये साचले, असे वंजारी यांचे म्हणणे आहे.

शुक्रवारीही जाेरदार पाऊस शहरात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास तुफान पाऊस सुरू झाल्याने त्र्यंबकराेडवर ठिकठिकाणी तर मुंबईनाका, संदीप हाॅटेलच्या समाेर रस्त्यावर पाणी साचले. कॅनडा काॅर्नर, शरणपूर सिग्नल, संभाजी चाैकातही अशीच परिस्थिती हाेती. तसेच महामार्गावरील इंदिरानगर, गाेविंदनगर बाेगद्याजवळ, वडाळानाका, द्वारका, तिगरानिया चाैकापर्यंत रस्त्यावर तासभर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा हाेत्या. या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पाेलिस उपस्थित हाेते.

रस्ता खाली, चेंबर वर शहरात अनेक ठिकाणी रस्ता खाली तर चेंबर वर अशी परिस्थिती आहे. चेंबर आणि ढापे हे रस्त्याच्या समांतर नसल्यामुळे पाणी तुंबत आहे. तसेच पावसाळापूर्व कामे करतानाच नाले, चेंबर आणि ढाप्यांमध्ये व्यवस्थित स्वच्छता न झाल्यामुळे पाणी तुंबल्याचा दावा नागरिक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...