आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी काळात उद्योग क्षेत्रात "क्लीन टेक्नॉलॉजी' आणि बांधकाम क्षेत्रात "ग्रीन बिल्डिंग्ज'ला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी "दिव्य मराठी'शी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार राज्यात ६२२ कोटी लिटर सांडपाणी प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते, त्यासाठी काय उपाययोजना आहेत, या प्रश्नावर आदित्य म्हणाले, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत काम करीत आहोत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वृक्षारोपण, औद्योगिक कारणांसाठीही वापर करत आहेत. औद्योगिक विकास महामंडळे व महापालिका यांचे करार करत आहोत, असेही आदित्य म्हणाले.
प्रश्न : महाराष्ट्र हवामान बदल परिषद या उच्चस्तरीय समितीची पुढील दिशा काय?
आदित्य ठाकरे : महाराष्ट्र हवामान बदल परिषद ही उच्चस्तरीय समिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तसेच अन्य संबंधित मंत्र्यांच्या सहभागाने ६ ठळक मुद्द्यांवर कार्यरत असणार आहे. याअंतर्गत आपण शाश्वत विकासासाठी तसेच हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी कार्बनरहित ऊर्जा निर्मिती, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, उद्योगात क्लीन टेक्नॉलॉजी, बांधकामात ग्रीन बिल्डिंग्ज, शाश्वत शेती व पशुसंवर्धन आणि आल्हाददायक शहरे या दिशेने काम करणार आहोत. पुण्याप्रमाणे राज्यातील अन्य शहरांमध्येही पर्यायी इंधन परिषदा घेणार आहोत. राज्यातील जनता व सरकार यांच्या कृतिशील सहभागातून पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या दिशेने राज्याची वाटचाल वेगाने सुरू आहे. नाशिक, औरंगाबाद व सोलापूर या शहरांचे वातावरण कृती आराखडे अंतिम टप्प्यावर असून जळगाव आणि अमरावतीचा लवकरच अमृत योजनेत समावेश करणार आहोत.
प्रश्न : राज्यातील अमृत शहरांत ‘रेस टू झीरो’ कमिटमेंटच्या अनुषंगाने कोळशावरील ऊर्जेची निर्मिती अपारंपरिक स्रोतांत बदलण्यासाठी ऊर्जा खात्यासोबत नियोजन, समन्वय कसे आहे?
आदित्य ठाकरे : महाराष्ट्रातील कोळशावरील ऊर्जेची निर्मिती अपारंपरिक स्रोतांमध्ये बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत एकूण १३,३०,८९५.०० टन इतक्या कार्बनचे उत्सर्जन टाळले आहे. तसेच नव्याने निर्माण केलेली सोलार क्षमता ४२.५१ मेगावॅट इतकी आहे. दावोसमध्ये आम्ही ३० हजार कोटी रुपयांच्या २३ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. यातील बहुतांश करार हे अपारंपरिक ऊर्जेशी निगडित आहेत. यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ६६,००० नवीन रोजगारांची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्राचे लक्ष कार्बन उत्सर्जन कमी करण्याकडे असल्याने आम्ही सौरऊर्जेच्या वापरास अत्यधिक प्रोत्साहन देत आहोत.
प्रश्न : "माझी वसुंधरा' अभियानामुळे महाराष्ट्रातील जल आणि वायू प्रदूषणात घट झाल्याचा परिणाम आहे का? असल्यास किती प्रमाणात?
आदित्य ठाकरे : माझी वसुंधरा अभियानात भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश ही पंच महाभूते एकमेकांशी संलग्न असल्याने आम्ही सर्व घटकांवर काम केले आहे. यालाच शाश्वत विकास म्हणतात. ८,९२४ पाझर तलाव, १५८.९४ लाख वृक्ष लागवड व १५,८३५ नवीन हरित क्षेत्र हा याचाच परिपाक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे ११,७९६ इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली. हे सर्व उपक्रम जनसामान्यांवर न थोपवता त्यांच्या सहभागाने शासकीय पातळीवर राबवत असल्यानेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.