आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये जास्तीचे प्रवासी कसे काय आले?:चौकशी करुन कारवाई करू - मंत्री संजय राठोड; खासगी बस सेवेसाठी धोरण ठरवण्याचे संकेत

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही बस यवतमाळहून निघाली तेव्हा बसमध्ये नियमाप्रमाणे 30 प्रवासी होते. मात्र, अपघात झाला तेव्हा जवळपास 50 प्रवासी बसमध्ये असल्याचे समोर आले. यावर यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बसमध्ये जास्तीचे प्रवासी कसे काय आले? याची चौकशी करुन कारवाई करु, असे सांगितले आहे.

सुरुवातीला 30च प्रवासी होते

मंत्री संजय राठोड म्हणाले, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. अपघात झाल्यानंतर मी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली. तेव्हा यवतमाळहून ही बस निघाली तेव्हा बसमध्ये नियमाप्रमाणे 30 प्रवासीच बसले होते, असे बसमालकांनी सांगितले आहे. मात्र, आता अपघातात जवळपास 40 जण जखमी तर 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. बसमध्ये अधिकचे प्रवासी कसे काय आले? हे प्रवासी नेमके कुठे बसले? कुणाच्या परवानगीने बसले? या सर्वांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

धोरणाबाबत विचार करू

मंत्री संजय राठोड म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. खासगी बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचाराचे साहित्य असणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त बसमध्ये हे साहित्य होते, असे समजते. तरीदेखील सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बसबाबत काही कायदे किंवा धोरण ठरवता येतील का, याबाबतही विचार करू.

घटना मन सुन्न करणारी

मंत्री राठोड म्हणाले, नाशिकमधील घटना मन सुन्न करणारी आहे. सर्व जखमींची रुग्णालयात काळजी घेतली जात आहे. मी स्वत: नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पुन्हा अशा घटना घडू नये, म्हणून जे जे करता येईल, ते सर्व करण्याचा प्रयत्न करू.

काही प्रवासी सीटखाली झोपले होते

अपघाताबाबत छगन भुजबळ यांनी सांगितले की, खासगी बसमध्ये 30 प्रवाशांनाच परवानगी असताना अपघात झाला त्यावेळी या बसमध्ये 50 प्रवासी होते. काही प्रवासी तर सीटखाली झोपले होते. त्यामुळेच मृत व जखमींचा आकडा वाढला.

बातम्या आणखी आहेत...