आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मंत्री माना डाेलवतात; सीएम फक्त ठाण्याचेच

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बाेलावले हाेते. आमच्या काही लाेकांनी फिल्मसिटीचे रस्ते, गार्डन वगैरेचे प्रश्न मांडले. कलाकारांचे प्रश्न काेण मांडणार? का नाही मिळत कलाकारांना भूखंड, आठ दिवसांचे आैषधेही येत नाही असे पेन्शन दिले जाते. २५ हजार रुपये का मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बाेलावले तेव्हा बराेबरचे लाेक सांगतात त्यांना ताप आहे, ते आजारी आहेत, फार बाेलू नका. मग आम्हा कलाकारांना बाेलावलेच कशाला? तुम्ही बरे असताना बाेलवा ना. मुख्यमंत्री फक्त ठाण्याच्या कलाकारांसाठी निर्णय घेणार आहेत की, महाराष्ट्रातील तमाम कलाकारांसाठीही निर्णय घेणार आहेत, असा घाणाघात अ. भा. मराठी नाट‌्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्तीच्या पदाधिकारी, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केला.

नाट्य परिषद नाशिक शाखेच्या पुरस्कार वितरण साेहळ्यात त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या की, सरकारदरबारी जेव्हा प्रश्न घेऊन जाताे तेव्हा मंत्री फक्त माना डाेलवतात. मग सरकार काेणाचंही असाे. मागचं असाे, सध्याचे असाे की आणखी काेणाचे सरकार असाे. कामं हाेत नाहीत. या आधीचे सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी काहीही केलं नाही. वाईट वाटतं त्यांच्या वडिलांनी कलाकारांचं किती भलं केलं. त्यांना कलाकारांची जाण हाेती. आताचंही सरकार फार काही करत नाही. कलाकारांना पेन्शन देताना ग्रेड ठरवली जाते.

हा अधिकार तुम्हाला काेणी दिला. तुम्ही कसं ठरवता हा ए ग्रेड ताे बी ग्रेड. सगळे कलाकार सारखंच काम करतात. त्यामुळे त्यांना पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळायला हवी हा मुद्दा मी मांडला. मात्र त्यावरच काय तर तळागाळातील कलाकारांच्या प्रश्नांवर अद्याप काहीही झालेलं नाही, हाेतंही नाही. कारण मराठी कलाकारांत एकी नाही, त्यांची युनियन नसल्याने आवाज उठवला जात नाही. शेतकरी आंदाेलन करतात, मराठा आंदाेलन हाेतं, कलाकार का नाही करत आंदाेलन. कारण एकत्र नाही. त्यामुळे आपला आवाज सरकारदरबारी पाेहाेचत नसल्याचे त्यांनी मांडले.

मुंबई मध्यवर्तीचे शाखेचे अध्यक्ष झाेपेत आहेत; कलाकार प्रश्न विचारणार की नाही
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे जसे काम चालते तसे मुंबईचे अजिबातच नाही. ती मध्यवर्ती शाखा असून तीन वर्षांपासून बेवारशी आहे. कारण परिषदेचे अध्यक्ष झाेपलेले आहेत. झाेपेचं साेंग घेणाऱ्याला जागं करणं अवघड असतं. ४५ लाेकांनी त्यांच्या विराेधात आवाज उठवला. राष्ट्रवादी सेलकडून काेविड मदत म्हणून कलाकारांना देण्यासाठी ४० लाख रुपये मिळाले हाेते. प्रत्यक्षात फक्त ८५ जणांना मदत मिाली. ९०० कलाकार नाेंदणीकृत आहेत. ७०० बॅकस्टेजचे आहेत. ३५० कार्यरत आहेत. असे असताना मग हा पैसा गेला कुठे? हा प्रश्न इतर कलाकार अध्यक्षांना का विचारत नाहीत.

येत्या सहा महिन्यांत परिषदेच्या निवडणुका आहेत. मात्र परिषदेचे प्रकरण न्यायालयात आहे. एक-दीड महिन्यात हा प्रश्न सुटेल असे सांगण्यात येते. जर तसे झाले नाही तर आंदाेलन करावं लागेल. फक्त मिटिंग घेऊन काहीच हाेत नाही. रंगभूमी पूर्ववत करण्यासाठी आपल्यालाच पाऊल उचलावं लागेल. त्यासाठी जागं व्हायला हवं. ठाेस काहीतरी करायला हवं. अन्यथा आपण भरडले जाणार आहाेतच, असेही मालपेकर यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...