आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक ते दिड फूट खड्ड्यांनी वेढलेल्या पेठराेड दुरुस्तीसाठी एकीकडे निधी नाही म्हणून रडायचे व दुसरीकडे ७१ काेटीचे क्राॅकीटीकरणच करायचे असा हट्ट धरून संपुर्ण नाशिकला वेठीस धरणाऱ्या महापालिका प्रशासनाचे राज्याच्या नगरविकास खात्यानेच कान टाेचले. पावसाळापुर्वी तीन महिन्यात डांबरीकरण करण्याचे आदेशच नगरविकास खात्याचे, अवर सचिव शंकर जाधव यांनी काढले आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही पालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून सकारात्मक भुमिका घेतली जात नसल्याचे बघून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी थेट विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिकेच्या काेर्टात चेंडू टाकला आहे.
राहु हाॅटेलपासून तर पुढे दिंडाेरीची हद्द सुरू हाेईपर्यंतचा जवळपास साडे सहा किमीचा पेठराेड मागील पावसाळ्यात पुर्णत: उखडला आहे. जवळपास साडे सहा किमीचा रस्ता खचला असून या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गुजरातकडून येणारे पर्यटक, स्थानिक रहीवासी तसेच दिंडाेरी, पेठकडून येणाऱ्या भाजीपाला व अन्य अवजड वाहनांचीही दयनीय अवस्था हाेत असून गत सप्टेंबर महिन्यापासून तर आतापर्यंत किमान शंभरहून अधिक आंदाेलनेही पेठराेड दुरूस्तीसाठी झाली नाही. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने अर्थिक परिस्थीती नाजुक असल्याचे सांगत ७१ काेटीची मागणी जिल्हा नियाेजन समितीकडे पाठवली मात्र नियाेजन समितीकडूनही हिरवा कंदील मिळालेला नाही.
त्यानंतर राज्याच्या बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरीत करून तिकडून निधी मिळताे का याची चाचपणी करून बघितले मात्र, त्यात यश आले नाही. त्यानंतर स्मार्टसिटीत वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदाराकडे हे काम २०१८ मधील जुने दर आकारून करण्याचे प्रयत्न झाले मात्र या ठेकेदाराने गावठाणात केलेल्या रस्त्यांची ‘किर्ती’ लक्षात घेत संबधिताला काम दिल्यास जन आंदाेलन हाेण्याची भिती निर्माण झाली.
दरम्यान, ढिकले यांनी सर्वच यंत्रणांकडून हाेत असलेली टाेलवाटाेलवी बघून विधीमंडळाने दिलेल्या अधिकारांचे अस्त्र उपसले व थेट तारांकीत प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधल्यानंतर आता तीन महिन्यात अर्थातच पावसाळ्यापुर्वी डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्याचे आदेश महापालिकेला राज्याच्या नगरविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे नगरविकास खात्याच्या आदेशाचे पालन करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
डांबरीकरण न केल्यास लक्षवेधी मांडणार
हाॅटेल राहूू ते नाशिकची हद्दीपर्यंतचा पेठराेड दुरूस्त हाेणे गरजेचे आहे. वारंवार मागणी करून गत आठ महिन्यात पालिकेने टाेलवाटाेलवी केली आहे. आता राज्य शासनानेच आदेश दिल्यामुळे तीन महिन्यात डांबरीकरणाचे काम हाेणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार. - अॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पुर्व
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.