आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मम्मी, पप्पा कधी येतील गं...आपणही पप्पांसारखे 'स्टार' होऊन राहू...; पतीच्या निधनानंतर पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सासरे घरी आल्यानंतर प्रकार उघडकीस

“मम्मी, पपा कधी येतील गं, मी रोज त्यांच्यासाठी पूजा करते, पण ते नाही येत गं, मम्मी पप्पा नाही तर तुही सॅड, मी पण सॅड.. चल मग आपण ही पप्पांकडे जाऊ. ते “स्टार’ झाले तसे आपणही “स्ट्रार’ बनून त्यांच्यासोबत राहू... या तिच्या शब्दांवर मी खूप विचार केला, अचानक मला काही झाले तर मुलीचे कसे होणार...म्हणून मी स्वत:च्या इच्छेने आमचे आयुष्य संपवत आहे..’ हे धक्कादायक शब्द आहेत, नाशिकच्या विनयनगर येथील सुखसागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुजाता तेजाळे यांचे. एप्रिलमध्ये त्यांचे पती प्रवीण तेजाळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या दु:खामुळे वैफल्यग्रस्त असलेल्या सुजाता (३६) यांनी ७ वर्षांची मुलगी अनयासह आत्महत्या केली. मुंबई नाका पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाने पती गमावल्यावर सुजाता आणि अनया त्या दु:खातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या सोबत त्यांच्या सासूबाई राहात होत्या. मात्र, वैद्यकीय उपचारासाठी त्या इंदिरानगरच्या घरी गेल्या असता हा प्रकार घडला. “माझे पती प्रवीण तेजाळे कोरोनात गेले. तेव्हापासून माझेही आयुष्य संपले आहे. कुणाशी बोलण्याची इच्छा राहिली नाही. एवढे दिवस मी फक्त मुलीसाठी काढत होते. तिलाही पप्पांची सारखी आठवण येते. मी तिला समजावलं ते स्टार झाले. तेव्हापासून ती विचारू लागली, ते स्टार कसे झाले? काल ती म्हणाली, पप्पा नाही म्हणून ती सॅड आणि मी पण सॅड. त्यापेक्षा आपणही स्टार बनून पप्पांसोबत राहू. माझे काही झाले तर हिचे कसे होणार असा विचार आला, त्यामुळे मी स्वत:च्या इच्छेने आमचे आयुष्य संपवत आहे’, अशी चिठ्ठी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली.

सासरे घरी आल्यानंतर प्रकार उघडकीस
सुजाता यांनी गळफास घेऊन आपले आणि मुलीचे जीवन संपवले. सकाळी अकरा वाजता त्यांचे सासरे नेहमीप्रमाणे नातीला भेटण्यासाठी गेले होते. बेल वाजल्यावरही आतून प्रतिसाद न आल्याने शेजारच्या तरुणाच्या मदतीने त्यांनी गॅलरीचा दरवाजा उघडला असता सुजाता आणि अनया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. मृतदेहाशेजारी चिठ्ठी आढळून आली असून पतीच्या निधनाचा विरह सहन होत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...