आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:सोमवारी 16 कोरोना रुग्ण; मास्कसक्तीचा प्रस्ताव

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सोमवारी (दि. १३) एकाच दिवशी कोरोनाचे १६ नवे बाधित रुग्ण आढळल्याने महापालिका खडबडून जागी झाली असून मार्च महिन्यानंतर तब्बल एकाच दिवशी १६ रुग्ण आढळल्याची पहिलीच वेळ असल्याने सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती करण्याचा विचार सुरू झाला आहे. अर्थात राज्य शासनाकडून नेमक्या काय सूचना येतात हेदेखील तपासले जाणार असून तूर्तास नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

६ एप्रिल २०२० रAजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आत्तापर्यंत या महामारीच्या तीन लाटांचा नाशिकला फटका बसला. पहिल्या लाटेत नागरिक सतर्क असल्याने फारसे मृत्यू झाले नाही. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिल्याने तिसरी लाट तुलनेने सौम्य ठरली होती.

त्यानंतर एप्रिल व मेमध्ये असे अनेक दिवस होते की त्या दिवशी एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र जून सुरू होताच पहिल्या १३ दिवसांत तब्बल १०६ रुग्ण आढळले. सध्या ७६ कोरोनाबाधित सक्रिय असून ते सर्व गृह विलगीकरणात आहेत. ७६ पैकी १३ रुग्णांनाच कोरोनाची स्पष्ट लक्षण आहेत. मात्र गृह विलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये करवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग होणार
बुधवार (दि. १५) पासून शहरातील सर्व शाळा सुरू होणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहे. ताप, सर्दीसारखी कोरोनाची लक्षणे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाशी संपर्क साधून विद्यार्थ्यास घरी पाठवावे, अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

नियम पाळावे
कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत असून सध्यातरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन व कोरोना प्रतिबंधात्मक लस तत्काळ घेतली पाहिजे.- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

बातम्या आणखी आहेत...