आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा:मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला; राज्यात 12 जूननंतर येण्याचा अंदाज

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून कर्नाटकात दाखल झाल्यानंतर गोव्याच्या सीमेवर रेंगाळला असून राज्यात आता तो १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो ७ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरू असून गोंदियात सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आगामी पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाचा जोर राहणार आहे. मध्य प्रदेशासह विदर्भात उष्णतेची लाट आहे. बिहार, आसाम आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत असून दोन ते तीन दिवसांत जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. सोमवारी मालेगाव तालुक्यात दुपारी काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

असा आहे अंदाज

राज्यात जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूर वेधशाळेने दिला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान

गोंदिया ४५.८, ब्रह्मपुरी ४५.२, नागपूर ४५.१, वर्धा ४४.८, यवतमाळ ४३.५, जळगाव ४२.४, अमरावती ४२.०२, गडचिरोली ४२.०, अकोला ४२.०, नांदेड ४०.८, बुलडाणा ३८.८, सोलापूर ३७.६, औरंगाबाद ३७.२, नाशिक ३६.४, परभणी ३२.६,कोल्हापूर ३२.१, महाबळेश्वर २६.४.

वातावरणीय बळकटी मिळाली तरच मान्सूनची आगेकूच होईल

मान्सून कर्नाटकमधील कारवार, चिकमंगळूर, बंगळुरू, धर्मापुरी व गोव्याच्या सीमेदरम्यान रेंगाळला असून वातावरणीय बळकटी मिळाल्यानंतर तो आगेकूच करू शकतो. नाशिक जिल्ह्यात १२ जूनदरम्यान हलक्या पावसाची सुरुवात होऊ शकते. ८ व ९ जूनपासून कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...