आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षानंतर कुंठीत वेतनश्रेणीचा लाभ:नाशिक महापालिकेतील शंभरहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधीचा अपुऱ्या मनुष्यबळामध्ये काम करणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली असून महापालिकेतील वरिष्ठ पदासाठी पात्र ठरलेले परंतु, पदोन्नती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना कुंठीत वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचारी त्यासाठी पात्र ठरणार असून त्यासंदर्भात विभागनिहाय खातेप्रमुखांकडून माहिती लेखापरीक्षण विभागाकडून घेतली जात आहे.

महापालिकेत गेल्या 24 वर्षांमध्ये नोकर भरती झालेली नाही. 'क' वर्ग आस्थापना परिशिष्टानुसार 7092 पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील जवळपास अडीच हजार पदे रिक्त असून संबंधित कामाचा बोजा अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडत आहे. कामाचा ताण असला तरी त्या तुलनेमध्ये आर्थिक सवलती व शासन नियमानुसार देय लाभ मिळत नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मध्यंतरी महापालिकेच्या विविध कर्मचारी संघटनेने देखील विविध प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेतला होता मात्र सध्या प्रशासकीय राजवट असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हिताचे निर्णय आयुक्तांच्या हातामध्ये आले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने आता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कुंठित वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पदासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना 12 वर्ष झाल्यानंतर कर्मचारी अश्वासीत प्रगती योजना तथा कुंठीत वेतनश्रेणी लागू केली जाते. आता हाच कालावधी 12 वर्षाहून 10 वर्षांपर्यंत ग्राह्य धरला जात असून, तसे शासनाचे आदेश आहेत. शासन निर्णयानुसार 2016-17 मध्ये वरिष्ठ पदासाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना फरकासह वेतनश्रेणी लागू करून रक्कम अदा केली जाणार आहे.

निधी नुसार ठरणार वेतनश्रेणीचा निर्णय

लेखा व वित्त विभाग तसेच लेखापरीक्षण विभागामार्फत विभागनिहाय खातेप्रमुखांकडून आढावा घेतला जात असून, आता केवळ सुरक्षा विभागाचा आढावा घेणे बाकी आहे. विभागनिहाय आढावा बैठका झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांची संख्या तसेच उपलब्ध निधी यानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात येऊन त्याचा लाभ दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...