आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोड प्रकरण:अवैध वृक्षतोडप्रकरणी खासदार पुत्रासह एकास 4 लाखांचा दंड ; नाशिक पोलिसांची गुन्हा दाखलसाठी टाळाटाळ

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे ‘हरित नाशिक’साठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे अपेक्षित असताना शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य गोडसे आणि त्यांचे व्यवसायातील भागीदार योगेश ताजनपुरे यांनी इमारत बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता तब्बल सात वृक्षांची अवैध कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी ही बाब पालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित वृक्ष ट्रकसह जप्त करण्यात आले. याशिवाय चार लाख २० हजाराचा दंड केला आहे. अवैध वृक्षतोड केल्यानंतर सामान्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस विभागाचे खासदारपुत्रावर कारवाईसाठी हात लटपटत असल्याचे चित्र आहे. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. १९ मधील देवळाली शिवारात सर्व्हे नं. १९३-२० ब, न्यू बालाजी हॉटेल ढाब्याशेजारील खर्जूल मळ्यातील जागेत विविध प्रजातींचे वृक्ष होते. उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी सांगितले की, वृक्षतोडप्रकरणी अजिंक्य गोडसे व ताजनुरे यांना ४.२० लाखांचा दंड ठोठावला असून गोडसे व ताजनपुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे.

या तरतुदीखाली होतो गुन्हा दाखल नियमानुसार, नागरी क्षेत्रात कोणत्याही मिळकतीमधील झाडांचे संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम कायदा १९७५ व सुधारणा अधिनियम २०२१ पारित केला आहे. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय वृक्षतोड अवैध मानली जात असून अवैध वृक्षतोड केल्यास दंडासह पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

गुन्हा दाखलसाठी चकरा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यासाठी चार वेळा पोलिस स्टेशनला चकरा मारल्यानंतरही दाद दिली गेली नाही. यासंदर्भात अजिंक्य गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ बाभळीचे झाड तोडल्याचे मला माहिती आहे असे सांगत अधिक माहिती देता येत नाही, असे सांगितले

बातम्या आणखी आहेत...