आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनदी नाेकरीची संधी:एमपीएससी परीक्षा 2023 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर; 3 पूर्वचा समावेश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र ३ अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे.

शासनसेवेतील पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२३ मधील परीक्षांचे वेळापत्रक आयोगाने निश्चित केले आहे. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. संबंधित संस्थांनी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

आयाेगातर्फे गत दहा वर्षांतील मोठी पदभरती
२०२२ रोजीच्या जाहिरातीत ११४ जागांची वाढ झाल्याने राज्यसेवेच्या ५०९ पदांवरून भरतीची पदसंख्या आता ६२३ इतकी झाली आहे. गत १० वर्षांतील ही सर्वाधिक पदसंख्या आहे. त्यामुळे पुढील वर्षी शासकीय नोकरीत जाण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

स्पर्धा परीक्षा तयारीचे नियाेजन हाेते साेपे
अंदाजित वेळापत्रकानुसार परीक्षेची तारीख समजली की विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात. अभ्यासाला गती येते. पुढील वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार असून अधिक जागा असल्याने विद्यार्थ्यांनी आता केवळ अभ्यास करणे आवश्यक आहे. - स्वप्निल देवरे, एमपीएससी मार्गदर्शक

बातम्या आणखी आहेत...