आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरव्यवहार:मुंबईची ड्रग पेडलर रुबिना शेखचा मालेगावमध्ये सातबारा उतारा, मालमत्ता म्हणजे मालेगावात विश्वासू हस्तक असल्याचा पुरावा

मालेगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या अमली पदार्थविराेधी पथकाने गुजरातमधून मुंबईची ड्रग पेडलर रुबिना नियाज शेख या महिलेला अटक केली आहे. १७ सप्टेंबर रोजी दैनिक भास्करच्या महेसाणा आवृत्तीने याविषयी वृत्त प्रसिद्ध केले असून आता तिच्या नावाने मालेगाव तालुक्यात दोन कोटींची मालमत्ता असून फार्म हाऊसच्या प्रयोजनासाठी तिने ५०० स्क्वे. मीटरचा प्लॉट घेतल्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहेत.यातून रुबिनाचा महामार्गालगत फार्म हाऊस बांधण्याचा उद्देश उघड झाला असून मालमत्ता व्यवहाराच्या मध्यस्थीचा शोध घेण्याचे पोलिसांना आव्हान आहे. रुबिना शेख ही महिला ४० जणांच्या माध्यमातून एमडी ड्रग्जचा व्यापार करत हाेती. मालेगावसह मंुब्र्यात एक सदनिका, तर कुर्ल्यात एक दुकान असल्याचे समाेर अाले. सध्या ती बांद्रा परिसरात राहत अाहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या मतानुसार रुबिना दुसऱ्याच्या हाताखाली काम करत असून मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेच्या शाेधात पथक अाहे. रुबिनाकडून ८० लाखांचे साेने व ३० लाखांची राेकड हस्तगत केली गेली अाहे. अमली पदार्थविरोधी पथक गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागे हाेते. नुकतेच तिला गुजरातमधील उंजा येथील मीरा दातारनगरमधून अटक करण्यात अाली. या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार निलाेफर संडाेले फरार अाहे.

मालेगावी दोन महागडे बंगले
मालेगाव शहरात साधारणपणे दाेन काेटींची मालमत्ता या रुबिनाने खरेदी करून ठेवल्याचे समाेर अाले अाहे. याचबरोबर अमली पदार्थविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार मालेगाव शहरात तीन महागड्या बंगल्यांसह इतर मालमत्ता असून तिची किंमत अंदाजे दाेन काेटी रुपयांपर्यंत असल्याचे समजते.

संशयास्पद मनसुबे मुंबई- आग्रा महामार्गालगत सायने शिवारातील जमिनीला कोट्यवधींचा दर आहे. त्यामुळे या भागात मालदार गुंतवणूकदार जमिनी खरेदी करण्यास उत्सुक असतात. रुबिनाच्या याच भागातील प्लॉट खरेदीने तिच्या दूरदर्शी उद्देशविषयी संशय बळावला आहे, याचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

रुबिना १२ कोटींची मालकीण अमली पदार्थविराेधी पथकाच्या म्हणण्यानुसार रुबिनाकडे १० ते १२ काेटींची मालमत्ता अाहे. अमली पदार्थविराेधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार इंग्रजी वृत्तपत्रात रुबिनाबाबत सविस्तर माहिती प्रकाशित केली हाेती. दैनिक भास्करनेही याबाबत वृत्त प्रसिद्ध केले हाेते.

मुस्लिम भागात ड्रग्जचा पुरवठा रुबिना प्रकरणात मुख्य सूत्रधार निलाेफर हीच असून जगभरातील वेगवेगळ्या देशांत एमडी ड्रग्जचा पुरवठा करते असे समजले अाहे. विशेषत: ग्रामीण परिसरातील मुस्लिमबहुल भागात तिचे एजंट एमडी ड्रग्जच्या पुरवठ्याचे काम करतात. बांद्रा, कुर्ला, भिवंडी, मुंब्रा या भागात जादा प्रमाणात एजंट असल्याचे समजते.

स्थानिक पोलिसांशी संपर्क नाही तपास यंत्रणेने स्थानिक पोलिसांशी अद्याप कुठलाही संपर्क केलेला नाही. रुबिनाची शहरात मालमत्ता असल्याचे कळले आहे. अधिक माहिती तपास यंत्रणाच देऊ शकेल. त्यांना तपासासाठी सहकार्य करू. चंद्रकांत खांडवी, अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव

फक्त मालमत्ता की ड्रग कनेक्शन ? रुबिनाने मालेगावात फक्त पैसे गुंतवण्यासाठी मालमत्ता खरेदी केल्या की त्यासोबत ड्रगसाठा व पुरवठा कनेक्शन आहे याची खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. मात्र तिच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता शहरात तिचे विश्वासू हस्तक असल्याचा पुरावा ठरल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...