आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसेच्या काळात शहर सौंदर्यीकरणासाठी वाहतूक बेट तसेच दुभाजकांना सामाजिक उत्तरदायित्व अर्थातच सीएसआर अॅक्टिव्हिटीतून विकसित करण्यासाठी घेतल्यानंतर त्यातून काही जणांनी देखभालीच्या मुळ हेतूला बगल देत परस्पर दुसऱ्या कंपन्यांची जाहिरातबाजी करून कमाईचा गोरखधंदा थाटल्याचे उघड झाले आहे. आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेत संबधितांचे करारनामे रद्द करण्यासाठी नोटीस पाठविली आहे. स्वत:ची सोडून दुसऱ्याची जाहिरात करणाऱ्या काही महाभागांनी स्वच्छता तर सोडाच मात्र, येथील रोप देखभालीलाही हरताळ फासल्याचा दुर्दैवी प्रकार आहे.
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पवार यांनी शहर सौंदर्यीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेत वॉर्ड ऑफिसर ते सहआयुक्त असा प्रवास करताना पाठीशी असलेल्या अनुभवाचे गाठाेडे त्यांनी विकासासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पदभार घेतल्यानंतर त्यांनी शहरात फेरफटका मारल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या मधाेमध असलेले दुभाजक तसेच वाहतूक बेटावर अस्वच्छता आढळली. याबाबत बांधकाम विभागाला जाब विचारल्यानंतर त्यांनी बहुतांश वाहतूक बेट व दुभाजक हे सीएसआर अॅक्टीव्हिटीतून देखभालीसाठी दिल्याचे पुढे आले.
देखभालीच्या बदल्यात संबधितांच्या कंपन्यांचे ब्रँडिंग करण्यासाठी जाहीराती लावण्यास मुभा दिली होती. प्रत्यक्षात मात्र, गेल्या काही वर्षांत पालिकेचे झालेल्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अनेक दुभाजक व वाहतूक बेटावर भलत्याच कंपन्यांचे जाहिरात फलक लावलेले दिसू लागले. आयुक्तांनी संबधित वाहतूक बेट व दुभाजकाची जबाबदारी काेणी घेतली, तेथे लावलेले जाहिरात फलक संबंधित कंपनीचाच आहे का याची खातरजमा केली. त्यात परवानगी घेतलेल्याएेवजी भलत्याचीच जाहिरात लावल्याचे पुढे आले. ही बाब लक्षात घेत आयुक्त पवार यांनी बांधकाम विभागाला आदेश देत करारनामे रद्द करण्यासाठी नोटीस काढली आहे. त्याचे उत्तर मागितले असून त्यानंतर करारनामे रद्द करून नवीन अटी-शर्तींद्वारे नवीन प्रायाेजकांना देखभालीसाठी दिले जाणार असल्याचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सांगितले.
सीबीएस घेणार मोकळा श्वास, चार मोठे होर्डिंग्ज हटणार
एकेकाळी शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून सीबीएसची ओळख निर्माण झाली ती बसस्थानकामुळे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी हे बसस्थानक महत्त्वाचे होते व आजही आहे. महत्त्वाची कार्यालये याच भागात आहे. मात्र या चौकात परिवहन महामंडळाच्या डेपोलगत चार मोठी होर्डिंग्ज लावली असून त्यामुळे विद्रुपीकरण होत आहे. हे होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.