आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोड:महावितरणकडून परस्पर वृक्षतोड ; पालिकेकडून कारवाईच्या हालचाली

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वीजतारांना अडचणीच्या ठरणारी झाडे व फांद्याची तोडणी करताना वृक्ष प्राधिकरण समितीची पूर्वपरवानगी न घेणे तसेच ताेडलेल्या फांद्या रस्त्यावरच टाकल्याने महावितरणविरोधात कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. समितीची परवानगी न घेतल्यामुळे संबंधित वृक्षछाटणी बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत वृक्षसंवर्धन कायद्यांतर्गत ठेकेदारावर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हेही दाखल हाेण्याची शक्यता आहे.

एवढेच नव्हे तर रस्त्यावर फेकलेल्या फांद्या उचलण्यासाठी पालिकेला आलेला खर्चही महावितरणकडून वसूल केला जाणार आहे. शहरात प्रत्येक कॉलनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहे. तसेच इमारत असो की बंगला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावण्यात आली आहेत. या ठिकाणावरून महावितरणच्या ओव्हरहेड तारा गेल्या असून पावसाळ्यात या तारांमध्ये झाडांच्या फांद्या घुसून शॉर्टसर्किट होते व त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो.

ही बाब लक्षात घेत दरवर्षी मे महिन्यामध्ये महावितरण कंपनीमार्फत ठेकेदार नियुक्त करून धोकेदायक वृक्ष तसेच फांद्यांची तोडणी केली जाते. नियमानुसार महापालिका क्षेत्रात कोणताही वृक्ष सोडण्यासाठी तसेच साधी फांदी छाटण्यासाठी वृक्ष संरक्षण व संवर्धन महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम कायदा, १९७५ व सुधारणा अधिनियम, २०२१ नुसार वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी न घेता वृक्षांची तोड केल्यास त्यास अवैध मानून दंडासह पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

तसेच एक वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. समितीचे अधिकार आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणला वा त्यांनी नियुक्त केलेल्या ठेकेदाराला वृक्षतोड वा वृक्षांची छाटणी करावयाची असल्यास उद्यान विभागामार्फत प्रस्ताव सादर करून त्यास आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र, महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता वृक्ष छाटणी केल्यामुळे तसेच रस्त्यांवर परस्पर फांद्या टाकल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.