आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड औद्योगिक वसाहतीत दरवर्षी पावसामुळे नाले तुंबतात. रस्त्यावरुन सांडपाणी कंपन्यांमध्ये शिरते. त्यामुळे वाहतूक व जनजीवनाला त्याचा फटका बसतो. यंदा हे टाळण्यासाठी अंबड इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), महापालिका आणि एमआयडीसीतर्फे मंगळवारपासून (ता. २१) संयुक्तरित्या स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी
अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे ज्वलंत प्रश्न ८ दिवसांत सोडवण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी आयमाच्या शिष्टमंडळास नुकतेच दिले होते. त्यानंतर सिडकोचे विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे उपअभियंता हेमंत पठ्ठे, कनिष्ठ अभियंता सूर्यकांत सूरकर, सहाययक अभियंता हेमंत भालेराव यांना तातडीने आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. यानंतर महापालिकेचे अधिकारी व आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहत परिसरात जेथे कचरा व पालापाचोळा साचून नाले तुंबतात त्या भागाची पाहणी केली.
मूलभूत सुविधा हव्यात
आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी जेथे नाले तुंबतात, अशी बारा ठिकाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. अनेक ठिकाणी कचराकुंड्या झाल्या असून तो परिसरही स्वच्छ करावा आणि अंबड औद्योगिक वसाहत परिसरात सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर विभागीय अधिकारी मयूर पाटील यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे आश्वासन दिले. मंगळवारपासून अंबड औद्योगिक परिसरात आयमा आणि महापालिकेतर्फे संयुक्तरित्या स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय झाल्याचे आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ व विश्वस्त समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले. पाहणी दौऱ्यात आयमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, सचिव गोविंद झा, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, कुंदन डरंगे, मूलभूत सुविधा समितीचे कार्याध्यक्ष हेमंत खोंड आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.