आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:नांदेडमध्ये सर्वाधिक 43.8 अंश तापमानाची नोंद, ‘असनी’मुळे अनेक भागांत ढगाळ वातावरण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असनी चक्रीवादळ ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, या वादळाच्या परिणामी महाराष्ट्रात अनेक भागांत हवामान ढगाळ राहिले. तरीही, उर्वरित भागांत पारा चढलेला होता.

विदर्भात कमाल सरासरी तापमान एक ते दीड अंश सेल्सिअसने कमी झाले होते. मात्र, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कहर कायम होता.त्यामुळे बुधवारी मराठवाड्यात प्रचंड उकाडा जाणवला.

हवामान विभागाने विदर्भात १२ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र बुधवारी विदर्भातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा काही अंशी घसरण झाली असून मराठवाड्यात उन्हाची तीव्रता वाढली होती. तर उत्तर महाराष्ट्र, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता कमी होती. तर राज्यात महाबळेश्वर येथे कमाल तापमान हे २८.९ नोंदले गेले होते.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सियस)
नांदेड ४३.८, अकोला ४३.५, ब्रह्मपुरी ४३.२, वर्धा ४३.२, अमरावती ४३.०, चंद्रपुर ४२.४, यवतमाल ४२.२, परभणी ४२.१, अहमदनगर ४२.०, बुलडाणा ४२.०, औरंगाबाद ४१.७, नागपुर ४१.६, गडचिरोली४१.४, गोंदिया ४०.५, सोलापुर ४०.२, बारामती ४०.२, उस्मानाबाद ४०.०, सातारा ३७.६, नाशिक ३६.८, पुणे ३६.३.

सोनेरी रंगाचा रथ आला वाहून : असनीचा परिणाम दिसू लागताच आंध्रात श्रीकाकुलम भागात समुद्रात एक सोनेरी रंगाचा रथ वाहून आला. बंगाल किनारपट्टीवरून वाहत आलेला हा सोनेरी रथ पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. परंतु, मूळ लोखंडी पत्र्याला सोनेरी मुलामा देऊन हा रथ तयार करण्यात आला आहे. रथावर १६ जानेवारी २०२२ ही तारीख लिहिलेली आहे.

असनी चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशच्या दिशेने
असनी आता आंध्रच्या दिशेने सरकत असून काही तासांत ते काकिनाडा ते विशाखापट्टनम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ८० ते १०० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे वादळ प. बंगालच्या दिशेने सरकत आहे. मराठवाडा, मुंबई, कोल्हापूर, सांगली भागात ढगाळ वातावरण राहील. काही भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...