आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइकडे शहरातील अत्यंत गरजेच्या रस्त्यांची ठोस मलमपट्टी करण्याचे सोडून आता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत फोडलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडूनच प्राप्त झालेल्या जवळपास १४० कोटी रुपयांच्या निधीतून दुरुस्तीचे कंत्राट देण्याचा निर्णय पालिकेने जाहीर केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत शहरातील रस्त्यांवर पालिकेने जवळपास १२०० काेटी रुपये खर्च केले आहेत. आणि आता पुन्हा रस्ते दुरुस्तीसाठी १०४.७४ कोटी तर खडी, मुरुम पुरवठ्यासाठी विभागनिहाय ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याने या खर्चाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
शहरातील नवीन रस्त्यांची गेल्या पावसाळ्यात दुरवस्था झाली असून या निकृष्ट दर्जाच्या रस्ते बांधणीचे ठेकेदारच आता दुरुस्तीच्या कामासाठी छुपे रिंग करीत असल्याचीही चर्चा असल्यामुळे महापालिकेचा बांधकाम विभाग वादात सापडला आहे. मध्यंतरी घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यासाठी एमएनजीएलने आवश्यकतेपेक्षा जास्तरस्त्यांचे खोदकाम केले.
काही ठिकाणी तर जवळपास निम्मे रस्ते खोदले आहेत. आता या फोडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली जवळपास १४० कोटी रुपयांच्या निधीचा चुराडा करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू असल्याचे बोलले जाते. मुख्य म्हणजे ज्यांच्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असे माेठमाेठे ठेकेदारच रिंग करून शहरातील सहाही विभागाच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मिळवण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जाते.
ठेकेदार, राजकारण्यांची मिलीभगत चर्चेत
गेल्या पाच वर्षांत महापालिकेने जवळपास बाराशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले अाहेत. सर्वसाधारणपणे एखादा रस्ता केला तर तीन ते पाच वर्षे तो सुस्थितीत असणे अपेक्षित असते. किंबहुना हा काळ त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा अर्थातच डिफेक्ट लायबिलिटीचा असून या काळात रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते.
शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे पूर्वी जे रस्ते झाले ते दहा वर्षे सुस्थितीत राहिले. गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यांतच उखडण्याचे प्रकार सुरू असून ठेकेदार व राजकारण्यांच्या मिलीभगतमुळे तसेच बहुचर्चित टक्केवारीचे प्रमाणही वाढल्यामुळे त्याचा परिणाम कामाच्या दर्जावर होत असल्याच्या आरोप होत आहे.
रस्त्यांसाठी १४० कोटींचे कंत्राट देण्याची संशयास्पद आहे. यापूर्वीच रस्ते डांबरीकरणातील भ्रष्टाचाराविरोधातील प्रकरण न्यायालयात आहे. आता पुन्हा हा खर्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल ऑडिट करणे गरजेचे आहे.
- दशरथ पाटील, माजी महापौर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.