आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिकच्या उद्योजकाने सीमेवरील लष्करी चौकीवर बसवली पहिली पवनचक्की, 9 लाखांच्या इंधनाची होणार बचत

नाशिक | संजय भडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
लष्करी चौकीच्या परिसरात पवनचक्कीची उभारणी करताना भारतीय जवान व स्थानिक काश्मिरी. - Divya Marathi
लष्करी चौकीच्या परिसरात पवनचक्कीची उभारणी करताना भारतीय जवान व स्थानिक काश्मिरी.

भारत आणि पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवरील अतिशय दुर्गम गुरेज या गावाजवळ देशाच्या शेवटच्या लष्करी चौकीवर पवनचक्की बसवण्यात आली असून आता तेथे चोवीस तास मोफत वीज मिळणार आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या चौक्या विजेसाठी आतापर्यंत जनरेटरवर अवलंबून होत्या. त्यासाठी वर्षाला नऊ लाखांचा खर्च होता.येथून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वापर पवनउर्जेसाठी होऊ शकतो हा विचार नाशिकच्या सुरेश कपाडिया या उद्योजकाच्या मनात आला आणि त्यांनी प्रत्यक्षात ही योजना साकारली. दोन दिवसांपूर्वी येथील चौकी पवनउर्जेतून झळाळून गेली आहे. लवकरच इतर परिसरातही अशा पवनचक्क्या उभारल्या जाण्याची ही सुरुवात मानली जात आहे. गुरेज परिसरात पाेहोचण्यासाठी रस्ताही तितकासा मोठा नाही. १२ हजार मीटर उंचीवरील राजधांग पासवर जाऊन पुन्हा खाली आठ हजार मीटर उंचीवर यावे लागते. येथे जी लष्करी चौकी आहे तिच्यापासून हाकेच्या अंतरावर पाकव्याप्त काश्मीर आहे. दोन्ही बाजूंचे सैनिक चाेवीस तास येथे तैनात असतात. अशा या महत्त्वाच्या चौकीवर वीजेसाठी वर्षभरात ९ हजार लिटर डिझेल लागत होते. डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्यास मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे कपडिया यांच्या लक्षात आले. काही वर्षांपूर्वी ते जेव्हा या परिसरात गेले तेव्हा तेथील सद्भावना स्कूलमध्ये दिवसाही असलेला अंधार बघून ऊर्जेचा अक्षय्यस्रोत असलेली पवनचक्की भेट देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार त्यांनी आपली योजना प्रत्यक्षात साकारली.

पवनऊर्जेचा अक्षय स्रोत काश्मीरमध्ये दुर्लक्षित
या प्रकल्पावर काम करताना विभागीय अधिकारी पांडुरंग पाेळ यांचे लक्ष कपाडिया यांनी वेधले. इतर तालुक्यांत पवनचक्की उभारून वीजपुरवठा निरंतर करता येऊ शकतो हे सांगितल्यावर तसा अहवाल देण्याचे पाेळ यांनी सांगितले. केंद्राच्या कोणत्याही संस्थेने अद्याप काश्मीरमध्ये पवनऊर्जेच्या अनुषंगाने विचार केला नसल्याचे समोर आल्याचे कपाडिया सांगतात.

स्थानिकांचे जीवन बदलू शकते पवनऊर्जा
^संपूर्ण काश्मीर खाेऱ्यात वाऱ्याचा उपयोग पवनऊर्जेसाठी होऊ शकतो. आज येथे डिझेल जाळून दोन तास वीजपुरवठा होतो, यातून खर्च वाढतोच शिवाय वायू प्रदूषणही होते. येथे पवनचक्कीद्वारे निरंतर ऊर्जा मिळू शकते. आमच्या प्रयत्नाने ही क्रांती सुरू होऊ शकेल. जी येथील लोकांचे जीवन व आर्थिक स्तरावर बदलू शकेल. -सुरेश कपाडिया, उद्योजक

बातम्या आणखी आहेत...