आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये लोक रस्त्यावर:प्रभाग क्रमांक 27, 29 मधील नागरिकांचे आंदोलन; खड्डे, अस्वच्छतेविरोधात असंतोषाचा भडका

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरातील सिडकोतील जुना प्रभाग क्रमांक २७ व २९ मधील पंडित नगर, भाद्रपद सेक्टर, मोरवाडी गाव, उत्तम नगर परिसर हा शहरातील असूनही एखाद्या ग्रामीण भागापेक्षाही अविकसित असल्याने संतप्त नागरिकांनी विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर बसून लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

मोरवाडी गाव, उत्तम नगर, भाद्रपद सेक्टर, पंडित नगर येथील बराचसा भाग हा प्रभाग क्रमांक २९ व २७ मध्ये मोडतो. येथील उघड्या पावसाळी नाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. शिवाय अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

खड्डेच खड्डे चोहीकडे

नाशिकमधील या भागात रस्ते व्यवस्थित नसून सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. वेळेवर घंटागाडी येत नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. पथदीप अनेक वेळा बंद असतात. हा भाग दोन्ही प्रभागांच्या मध्यभागी असल्याने नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. येथे रोजंदारीवर काम करणारे मजूर व कंपनी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे.

लोकप्रतिनिधींनी केले दुर्लक्ष

लोकप्रतिनिधी फक्त मत मागायला येतात, नंतर लक्षही देत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर विकास कामे झाली नाहीत, तर मोठे आंदोलन उभारू असेही नागरिकांनी सांगितले. रस्त्यावर लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांनी ठिय्या मांडत मनपा प्रशासनाचा निषेध केला. सामजिक कार्यकर्ते गौरव केदार यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विठ्ठल लोहार, चंद्रभान काळे, शिवराज बनसोडे, बुरकुले मावशी, मनोज केदार, बाळा चाकोर, विशाल जैस्वाल, ऋषी जगताप, शरद पवार, विमल बनसोडे, जया खणपटे, प्रवेश खंदारे, अजय बागुल आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मनपाच्या गेटवर आंदोलन

अनेक वर्षांपासून आमचा भाग दुर्लक्षित ठेवला आहे. ड्रेनेज, अस्वच्छता, डास, आरोग्य, पथदीप, रस्ते असे प्रश्न सुटलेच नाहीत. यानंतर दखल न घेतल्यास मनपाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करू.

- गौरव केदार, सामजिक कार्यकर्ते

आधिकारी गेंड्याच्या कातडीचे

आम्ही अनेक वेळा आमच्या तक्रारी करायला मनपा कार्यालयात गेलो. यावेळी आधिकारी आमच्याशी उद्धट बोलतात. या खुर्चीत तुम्ही बसून काम करून दाखवा, असा उलट प्रश्न करतात. हे आधिकारी गेंड्याच्या कातडीचे असून जनतेच्या पैशाची लूटमार सुरू आहे.

- विठ्ठल लोहार, जेष्ठ नागरिक

बातम्या आणखी आहेत...