आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थितीचा बळी:स्टंटबाजी बेतली जीवावर; अखेर आंदोलनासाठी पालिकेत आणलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी महापालिकेत दोन कोरोना रुग्णांसह आंदोलनाचा स्टंट

काेराेनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याचा कळवळा केवळ अापल्यालाच या अविर्भावात अाॅक्सिजन लेव्हल ३५ टक्के असलेल्या बाबासाहेब काेळे रुग्णाला बुधवारी (दि. ३१) थेट महापालिकेत अाणून केलेली अांदाेलनाची स्टंटबाजी अखेरीस काेळेंच्या जीवावर बेतली. अांदाेलकावर काय व्हायची ती कारवाई हाेईल. पण, यात मृत्यू झालेल्या काेळेंच्या कुटुंबियांना सांभाळणारे छप्परच कायमचे गेल्याने त्यांची जबाबदारी स्टंटबाजी करणारे अांदाेनलकर्ते घेणार का? असा प्रश्न अाता उपस्थित हाेताे अाहे. सरकारी रुग्णालयांमध्ये वारंवार खेट्या मारून बेड मिळत नसल्याचे कारण देत बुधवारी (दि. ३१)सायंकाळी पालिका प्रवेशद्वारावर आंदोलनासाठी आणलेल्या एका कोरोनाबाधिताचा गुरुवारी (दि. १) सकाळी बिटको रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याबाबत प्रशासनाकडे थेट तक्रार करण्यासाठी अनेक मार्ग असताना आंदोलनाची स्टंटबाजी संबंधित रुग्णाच्या जीवावर बेतली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित स्टंट करणाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा तर दाखल केलाच मात्र, या प्रकरणाची दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्फत चौकशी समिती नेमून नेमका दोष यंत्रणेचा की आंदोलकांचा तसेच नेमके काय घडले हे शोधण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक शहरामध्ये कोरोना झपाट्याने पसरत असून दिवसाला सरासरी दीड ते दोन हजार रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन, बिटको रुग्णालयांमध्ये बेडची सज्जता केली असून याबरोबरच ५०० खाटांचे समाजकल्याण तसेच मेरी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

त्याबरोबर सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिम सुरू करत या ठिकाणी संपर्क केल्यानंतर तातडीने बेड उपलब्ध करून दिला जात आहे. गेल्या सहा दिवसांत आयुक्तांनी खासगी रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर असलेले जवळपास बाराशे बेड वाढवले आहेत. बेड मिळत नसल्याच्या तक्रारी कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बुधवारी सायंकाळी सिडकोतील कामटवाडे परिसरात राहणारे बाबासाहेब कोळे या ३६ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला पालिका प्रवेशद्वारावर बेड मिळत नसल्याचे कारण देत सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी आणले. या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी हे डोके यांच्याबरोबर प्रशासनाला बेड मिळत नसल्याबाबत जाब विचारला. प्रशासनाला जाब विचारला जात असताना दुसरीकडे मात्र ऑक्सिजन सिलिंडर लावलेल्या स्थितीत कोळे या रुग्णाची तगमग वाढत होती.

हे सुरू असताना आणखी एक संकपाळ नामक सिडकोतील डीजीपीनगर भागांमध्ये राहणारा २८ वर्षीय कोरोनाबाधितदेखील बेड मिळत नसल्याचे कारण देत आंदोलनासाठी उतरला. मुळात बेड मिळत नसेल तर वैयक्तिक आयुक्त वा प्रशासनाशी संपर्क साधून तसेच अन्य उपाय योजणे गरजेचे असताना रुग्णांना अत्यवस्थ स्थितीमध्ये पालिका प्रवेशद्वारावर आंदोलनासाठी बसवल्यामुळे त्यांच्या तर जीवाला धोका निर्माण झाला. मात्र या संसर्गजन्य आजारांची त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना पसरण्याची भीती निर्माण झाली. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त जाधव यांनी प्रथम दोन्ही बाधितांना रुग्णालयांमध्ये हलवले. त्यातील संकपाळ नामक रुग्ण यापूर्वी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्यामुळे तो भेट करून दोन रात्री पुन्हा मूळ उपचार घेत असलेल्या रुग्णालयात परतला. त्यामुळे दिवस स्टंटबाजीसाठी या दोन्ही रुग्णांचा जीव धोक्यात घातल्याचा निष्कर्ष काढून प्रशासनाने डोके यांच्या विरोधामध्ये सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे कोळे यांचा बिटको रुग्णालयांमध्ये गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे आता कोळे यांच्या मृत्यूस नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून पालिका आयुक्त जाधव यांनी चौकशी समिती गठित केली आहे.

हे आहेत चौकशीचे प्रमुख मुद्दे...
अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यासह लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे हेच या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून प्रामुख्याने मयत कोरोनाबाधित व्यक्तीला बेड मिळवण्यासाठी काय प्रयत्न झाले, बिटको तसेच डॉ. हुसेन रुग्णालयांमध्ये कोणाशी संपर्क साधला गेला, पालिकेच्या सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिमला फोन केला गेला होता का, दोन्ही रुग्णालयात जर प्रत्यक्ष रुग्ण गेला असेल तर ते तपासण्यासाठी येथील सीसीटीव्ही फुटेज बघणे आदी चौकशीचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.

बाबासाहेब काेळे यांचे कुटुंबच वाऱ्यावर...
या स्टंटबाजीचे बळी ठरलेले ३७ वर्षीय बाबासाहेब काेळे हे अत्यंत मितभाषी, शांत स्वभावाचे हाेते. ते जालना जिल्ह्यातील असून ते पंधरा वर्षांपूर्वी कामटवाडे भागात वास्तव्यास अाले. ते एका हार्डवेअर दुकानात काम करीत हाेते तर त्यांची पत्नी धुणी-भांड्याची कामे करून अार्थिक हातभार लावत हाेत्या. त्यांना अाठ वर्षांचा मुलगा व लहान मुलगी अाहे. त्यांची बहीण व मेहुणा हे दाेघेही जवळच राहतात. तर त्यांचे अाई-वडील हे जालना येथे लहान-माेठी कामे करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबच वाऱ्यावर अाले अाहे. काेळे यांना गेल्या अाठ दिवसांपासून किरकाेळ त्रास हाेता, मात्र २८ मार्चला हा त्रास वाढला. स्थानिक दाेन डाॅक्टरांकडून त्यांनी उपचारही घेतले हाेते. मात्र, ३० मार्च राेजी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या मेहुण्याने झाकीर हुसेन, बिटकाे तसेच मविप्र मेडिकल काॅलेज या ठिकाणी बेड मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा केला अाहे. मात्र, काेराेना चाचणी अहवालच नसल्यामुळे तसेच बेड फुल्ल असल्याचे कारण देत प्रवेश नाकारल्याची खंत त्यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.

दुसरा बाधित रुग्णही येणार अडचणीत
याच अांदाेलनात काेराेनाबाधित संकपाळ नामक २८ वर्षीय युवकही आला होता. मात्र त्यास वरकरणी कोणताही त्रास दिसत नव्हता. तो स्वतः या ठिकाणी चालत आला होता. एका खासगी रुग्णालयात ताे उपचार घेत असताना आंदोलनासाठी आल्यामुळे त्याने स्वतःचा तसेच अन्य व्यक्तींचा जीव धोक्यात अाणला. नियम मोडून अनेक ठिकाणी वावरला. त्याला आंदोलनासाठी कोणी बोलावले हेदेखील तपासले जाणार असून त्याच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यासाठी त्याचा जबाब नोंदवून पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिले.

पालकमंत्र्यांचे अादेश
पालकमंत्री भुजबळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले. या रुग्णास जिल्हा रुग्णालयात बेड मिळाला की नाही? बेड होता का? असेल तर का नाही दिला. उपचारात काही कसूर केली का या सर्वच बाबींची सविस्तर माहिती घेऊन नेमकी चूक कोणाची याबाबत महापालिका स्तरावर चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचे अाश्वासन भुजबळांनी दिले.

अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
हे प्रकरण म्हणजे प्रशासनाला अकारण बदनाम करण्यासाठी कोणीतरी त्या दाेन्ही रुग्णांना बोलावले होते असा त्यातून अर्थ निघतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून शासनाला अहवाल पाठवला जाईल. - कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

दिपक डोकेला अटक

कोरोनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला अाॅक्सिजन लावून राजीव गांधी भवनमध्ये आंदोलन करत स्टंट करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दीपक डोके यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्ण दगावल्याने सदोष मनुष्यवधाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेच्या सुरक्षा पर्यवेक्षक कैलास भाबड यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. ३१) सायंकाळी ६ वाजता राजीव गांधी भवन येथे डोके याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून घेत कोरोना रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर लावलेल्या स्थितीत रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होईल अशाप्रकारे अाणि इतरांना संसर्ग होऊ शकतो याची माहिती असतानादेखील घातक कृत्य केले अशी तक्रार पोलिसांत दिली. याआधारे संशयित डोकेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी डोकेला अटक केली अाहे. प्रकृती बिघडल्याने त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले आहे. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

डोके याचा सीडीआर तपासणार
दीपक डोके याने यापूर्वीदेखील अशीच स्टंटबाजी केल्याची असल्याची माहिती आयुक्त जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तांमार्फत त्याच्या मोबाइलची सीडीआर तपासण्याची विनंती केली आहे. जेणेकरून त्याने बेड मिळवण्यासाठी काेणाला संपर्क केला, त्याबरोबरच हे आंदोलन करण्यासाठी त्यास कोणी पाठबळ दिले याचा छडा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...