आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा रुपयांचे अतिरिक्त तिकीट दिल्याने बस वाहकास मारहाण:नाशिकची घटना; प्रवाशी महिलेने वाद घालून फोनवरुन घरच्यांना बोलावून घेतले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिरिक्त तिकीट दिल्याच्या रागातून एका महिला प्रवाशाने मुलाच्या मदतीने एसटीच्या वाहकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार द्वारका चौकात घडला. संशयित महिला आणि तीच्या मुलासह दोघांच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, वैभव खरात (रा. करमाळा, सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करमाळा आगाराची (क्र. एमएच 14 बीटी 2835) ही बस चालक महादेव शेंबरे (रा. सोलापुर-नाशिक) प्रवाशी वाहतूक करत असतांना शिर्डी ते नाशिक प्रवासाच्या दरम्यान, दोन अनोळखी प्रवाशांनी नाशिकरोड बसस्थानकाचे तिकीट घेतले होते. त्यापैकी एक महिला व तीचा लहान मुलगा नाशिकरोड बसस्थानकात उतरून गेले.

द्वारका सर्कलमध्ये वाहकास बाहेर खेचून मारले

एक महिला प्रवाशी नाशिकरोड येथे न उतरता बसमध्ये बसून राहिली. वाहक खरात यांनी त्यांना अतिरिक्त 10 रुपयांचे तिकीट दिले. महिलेने वाहकाशी वाद घालणे सुरू केले. याच दरम्यान त्या महिलेने तीच्या मुलाला फोन करत सारडा सर्कलवर बोलावून घेतले. बस द्वारका सर्कलवर आली असता संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदारांनी बसमध्ये बळजबरीने प्रवेश करुन वाहक खरात यांना बेदम मारहाण केली. बस मधून खाली खेचून पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. घडलेला प्रकार एसटी नियंत्रण विभागाला कळवण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक सुनिल रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासणी सुरू

संशयित प्रवासी महिलेचे नाव पत्ता माहित नसल्याने पोलिसांनी सारडा सर्कल ते द्वारका परिसर आणि घटनास्थळाच्या जवळपास असलेले सीसी टिव्ही कॅमेरा तपासणी सुरु केली आहे. जवळपास 40 ते 50 कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत असून संशयित यात कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशयितांना लवकरच अटक होईल

वाहकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचे वर्णन सीसीटिव्हीमध्ये कैद झाले असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. - सुनिल रोहोकले, वरिष्ठ निरीक्षक.

बातम्या आणखी आहेत...