आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik | Drugs | Sting Operation | One Hundred Grams Of Charas In 5 Thousand, 10 Grams Of Brown Sugar In 5 Thousand, 10 Thousand Kilograms Of Cannabis

दिव्य मराठी स्टिंग:खुलेआम माला‘माल’अमली पदार्थांची आजही होतेय सुसाट विक्री; शंभर ग्रॅम चरस 5 हजारांत, 10 ग्रॅम ब्राऊन शुगर 5 हजारांत, 10 हजारांत किलोभर गांजा

विवेक बोकील, सचिन जैन, झहीर शेख | नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन खान प्रकरणानंतर अमली पदार्थांच्या नेटवर्कला शह मिळाल्याचा दावा यंत्रणेमार्फत केला जातो. प्रत्यक्षात मुंबईबाहेर औरंगाबादच्या जिन्सीपासून जळगावमधल्या एरंडोलपर्यंत आणि पुण्यातल्या कोंढव्यापासून जुन्या नाशकातल्या भद्रकाली परिसरापर्यंत चरस, गांजा, एमडी पावडर यांच्या खरेदी-विक्रीची बजबजपुरी राज्यात कायम असल्याचे “दिव्य मराठी’ टीमच्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड झाले आहे.

“अभी तो माल मिलना मुश्किल है..’

या वाक्यानं हा संवाद सुरू होत होता. पण थोडा पाठपुरावा केल्यावर, अनेक माध्यमातून संपर्क साधल्यावर, महत्त्वाचं म्हणजे अधिकचे पैसे मोजण्याची तयारी दाखवल्यावर मात्र, “कौनसा माल? हरा माल या सफेद माल?’ अशी समोरून विचारणा झाली. हरा माल म्हणजे गांजा १० हजार रुपये किलो, चरस ५ हजार शंभर ग्रॅमसाठी, ब्राऊन शुगर ५ हजार १० ग्रॅमसाठी असा “रेट’ही कळवला गेला.

पैसे भरायचे आणि मालाची वाट बघायची ही पद्धत सांगितली गेली. “हरा माल’ तर सहज मिळेल, निरोप आला. “सफेद’ मालाची कुणी हमी घेत नव्हतं. मुंबईतल्या कारवाईमुळे मुख्य पेडलर्स “आऊट ऑफ रिच’ झालेले. स्थानिक युजर्सही घाबरलेले असे चित्र निर्माण केले गेले असले तरी संपर्क आणि जरासा पाठपुरावा केल्यावर मात्र आमच्यापर्यंत मागणीनुसार “माल’ पोहोचला. २ हजार रुपयांत १ तोळा चरसची गोळीही मिळाली.

हिरवा माल म्हणजे गांजा तर सर्वच शहरांमधून सर्रास उपलब्ध झाला. ३०० रुपयांना ५० ग्रॅम खुल्ला, ५० रुपयांना १० ग्रॅमची पुडी... हे सर्रास मिळते. मात्र अन्य ड्रग्जही उपलब्ध होतात ती या पद्धतीने... पानटपऱ्यांपासून काही अंतरावर उभी असलेली मुलं टपरीवरून रिझला पेपर किंवा गोगो रोल्स घेतात. फोनाफोनी होते. एखादा बाइकवरून येतो. वाट बघणारा त्याच्या मागे बसून जातो. एखादा बराच वेळ टपरीच्या आसपास घोटाळतो.

ठरलेल्या संकेतानुसार दुसरा येतो आणि कुणाला कळण्याच्या आतच त्यांच्यात ‘एक्स्चेंज’ होते. इथून हवा तो “माल’ घेतला जातो आणि अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये बाइक लावून कार्यक्रम सुरू होतो, असे चित्र थोड्याफार फरकाने राज्यातील विविध शहरांत पाहायला मिळाले.

व्यावसायिक महाविद्यालये, त्यांचे होस्टेल्स या रॅकेटची केंद्रे बनल्याचे सांगितले जाते. काही शहरांच्या मध्यवर्ती भागात ‘स्नेक बाइट’चे प्रकारही नशेसाठी सर्रास सुरू असल्याचे कळते. “येस, वी ऑल कॅन फ्लाय...’ ही टॅगलाइन असलेला रिझला पेपर आणि गोगो रोल्समधून या मालाचा धूर सोडताना तरुणाईचे चित्र जागोजागी पाहावयास मिळाले.

ड्रग ट्रॅफिकिंगचा छुपा मार्ग
दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतून गांजा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामार्गे नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये येतो. तर, चरस हिमाचल प्रदेश, हरियाणामधून आणले जाते. हे पदार्थ थेट पुण्या-मुंबईत पाठवणे धोक्याचे असल्याने नाशिक, औरंगाबाद, जळगावमार्गे त्यांचे वितरण केले जाते.

हा घ्या पुरावा : अमली पदार्थांची विक्री व वितरण हा कायद्याने गुन्हा असल्याने पोलिस यंत्रणा याबाबत कडक कारवाई करत असल्याचा दावा करते. तरी “दिव्य मराठी’च्या टीमने मिळवलेले हे पुरावे. २ तोळे चरसची गोळी २ हजार रुपयांत तर ५० ग्रॅम गांजा ३०० रुपयांत उपलब्ध झाला.

बातम्या आणखी आहेत...