आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस भरती रॅकेट:नाशिक पालिकेतील 700 पदांसाठी सोशल मीडियावर बोगस नोकरभरती; आयपीबीएस मंजुरीआधीच प्रताप

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 24 वर्षात महापालिकेत नोकर भरती झाली नसल्यामुळे बेरोजगारांसाठी आशादायी असलेली पालिकेतील 700 पदांची नोकर भरती आता वादात सापडण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या आयपीबीएस या कंपनीसोबत करार रखडला असताना दुसरीकडे, सोशल मीडियावर मात्र, नोकर भरती वाजत गाजत सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर, नोकर भरतीसाठी अर्ज भरण्याची लिंक ही उपलब्ध करून दिली असून या ठिकाणी पैसे भरण्याच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक होण्याची भीती आहे.

7082 पदे पालिकेत मंजूर

‘क’ वर्ग आकृतीबंधानुसार जवळपास 7082 पदे पालिकेत मंजूर असून गेल्या 24 वर्षांपासून महापालिकेत कुठलीही नोकरभरती न झाल्यामुळे सध्यस्थितीत जवळपास चार ते साडे चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. दाेन ते अडीच हजार अधिकारी व कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झाले आहेत.

706 पदांसाठी नोकर भरती

आस्थापना खर्च 35% पेक्षा अधिक असल्यामुळे नोकर भरतीमध्ये अडचणी येत होत्या. मात्र, आस्थापना खर्च कमी करण्यामध्ये प्रशासनाला यश आले. ही बाब लक्षात घेत शासनाने आरोग्य-वैद्यकीय, अग्निशामकसह विविध संवर्गांतील, तसेच नवनिर्मित अशा 875 नवीन पदांना मंजुरी देण्यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्यातील आता 706 पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे.

सोशल मीडियातून पसरवले जाळे

नोकरभरतीसाठी आयबीपीएस या संस्थेची निवड झाली असून सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असताना पदवीधर मतदार संघासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे आता आचारसंहितेनंतर संबंधित प्रक्रिया सुरू होईल पण त्याआधीच चक्क सोशल मीडियावर महापालिकेच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली गेली.

फसवणूक टाळण्याची गरज

प्रामुख्याने महापालिकेत 2 हजार रिक्त पदांसाठी अर्ज भरण्यासाठी ठराविक लिंकवर क्लिक करून एक ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. ॲप डाऊनलोड करताना ओटीपी तसेच खासगी माहिती विचारली जात असल्याने त्यातून बेरोजगारांची फसवणुक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भरती प्रक्रियेला अद्याप सुरुवात नाही

पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागु असल्याने आयबीपीएस संस्थेमार्फत वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये - मनोज घोडे पाटील, उपायुक्त, प्रशासन महापालिका.

बातम्या आणखी आहेत...