आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूरमध्ये कांद्याची फक्त दोन रुपयांची पट्टी मिळाली. या बातमीची थेट विधिमंडळात चर्चा झाली. ही चर्चा थांबते न थांबते तोच, आता नाशिकमध्ये भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने चक्क पाच एकर कोबीवर नांगर फिरवल्याचे समोर आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबीवर नांगर फिरवला. कोबी पिकाला फक्त 1 रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पीक काढण्यासाठी काढणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरवल्याचे त्यांनी सांगितले.
पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर 50 हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा 2.50 लाख रुपये खर्च आला. मात्र, कोबी पिकाला केवळ एक रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी सरकारचा निषेध नोंदवीत आपल्या पाच एकर कोबीच्या पिकावर नांगर फिरविला. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही, तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे. आपण कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असे अंबादास खैरे यांनी म्हटले आहे.
मी एक सुज्ञ युवा शेतकरी असून आपण कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने या शासनाला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भाग पाडले जाईल. सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे. अन्यथा शासनाला पळता भुई थोडी करू.
– अंबादास खैरे, शेतकरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.