आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीची भूमिका:निर्माल्य नदीपात्रात गाेदावरी पुन्हा अस्वच्छ; पालिकेचे दुर्लक्ष नदीपात्र स्वच्छतेबाबत नागरिक उदासीन

प्रतिनिधी | नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरीचे प्रदूषण राेखण्यासाठी ठाेस उपाययाेजना कराव्यात अशा सूचना महापालिकेला उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याठिकाणी विविध सणाेत्सवानिमित्त पूजन करण्यात येत असल्याने नदीपात्रात निर्माल्य साचून प्रदूषण वाढत आहे.

त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त गुरुवारी या ठिकाणी भाविकांनी मनाेभावे पूजा केली, मात्र शुक्रवारी गाेदापात्रात माेठ्या प्रमाणात निर्माल्य पडल्याचे दिसून आले. याठिकाणी निर्माल्य कलश नसल्याने थेट नदीपात्रात फुल, पाने, फळ टाकले जातात तसेच इतर कचराही पडताे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज असून भाविकांनीही गाेदावरीची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. गाेदावरीचे वाढते प्रदूषण राेखण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली काेट्यवधीचा खर्च

स्मार्ट सिटीअंतर्गत गाेदावरी सुशाेभीकरणाच्या नावाखाली गाेदावरी काठ परिसरात काेट्यवधी रुपये खर्च करत विविध कामे केली जात आहेत. मात्र गाेदावरीच्या स्वच्छतेकडे महापालिका तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे.

नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज
शहराची जीवनवाहिनी असलेली गाेदावरी नदी प्रदूषणाच्या गर्तेत सापडली आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच काेणीही नदीच्या प्रदूषणात भर टाकत असेल तर त्यांना नागरिकांनीच राेखण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्वच्छता राखा, गोदेचे प्रदूषण राेखा
त्रिपुरारी पाैर्णिमेला भाविकांनी गाेदावरी नदीपात्रात पूजन केल्यानंतर याठिकाणी माेठ्या प्रमाणात निर्माल्य पडल्याने गाेदावरीच्या प्रदूषणात भर पडली आहे. भाविकांनी नदीचे पावित्र्य जपण्याबराेबरच ती प्रदूषित हाेऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ‘दिव्य मराठी’तर्फे गाेदावरी स्वच्छ ठेवण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात आले आहे आणि यापुढेही ते करण्यात येईल. यामागे गाेदावरीचे प्रदूषण राेखणे हा उद्देश आहे. महापालिका प्रशासनानेही गाेदावरीचे प्रदूषण राेखण्यासाठी कठाेर नियमांची अंबलबाजवणी करण्याची तसेच स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

निर्माल्य कलश गायब
त्रिपुरारी पाैर्णिमेला गाेदाकाठावर भाविकांनी पूजा केल्यानंतर याठिकाणी नदीपात्रातच निर्माल्य टाकल्याने गाेदावरीच्या प्रदूषणात भर पडली आहे. गाेदाकाठ परिसरात पालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी हजाराे रुपये खर्चून निर्माल्य कलश बसविण्यात आले हाेते. मात्र पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे निर्माल्य कलश गायब झाले आहेत. या प्रकारामुळे पालिकेचा भाेंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

या प्रकारामुळे नदीच्या अस्वच्छतेत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. त्रिपुरारी पौर्णिमा पडल्यानंतर अनेक नागरिकांकडून थेट नदीपात्रात निर्माल्य फेकण्यात आलेले हाेते. परिणामी रामकुंड, संत गाडगे महाराज पूल परिसर, टाळकुटेश्वर मंदिर परिसरात असलेल्या नदीपात्रात ठिकठिकाणी निर्माल्य पसरल्याचे चित्र पहावयास हाेते.

विशेष म्हणजे याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्वच्छतेबाबत काेणत्याही ठाेस उपायाेजना करण्यात आलेल्या नाहीत. या प्रकारामुळे नदीच्या अस्वच्छतेत भर पडत असल्याने याबाबत पालिकेच्या आयुक्तांनीच गंभीरपणे लक्ष देऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...