आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेचे अधिकारी आम्ही सज्ज आहोत असे कितीही म्हणत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महत्त्वाचे ठरलेले नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमधील कोविड सेंटर अस्वच्छतेने तर ग्रासलेलच आहे पण, येथील गाद्या, बेडशिट्स आणि इतर वस्तूही खराब अवस्थेत पडल्या असल्याचे दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळले आहे.
८०० ते १००० रुग्णांची क्षमता असलेल्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा असून परिचारिकांनाच रुग्णालयात स्वच्छता करावी लागत आहे. या रुग्णालयात अद्यापही किमान ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांची गरज आहे, तर रुग्णांची संख्या बघता १५० वॉडबॉय यांची गरज आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाशिक महापालिकेच्या या कोविड केअर सेंटरचा दुसऱ्या लाटेवेळी ९१ टक्के हा रिकव्हर रेट होता. मात्र आता या ठिकाणी महापालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे देखभालीऐवजी नवीन वस्तू खरेदीकडेच अधिक लक्ष आहे. याठिकाणी बालकक्षामध्ये बेड दिसतात मात्र त्यावरील गाद्या, चादरी, उशा अस्ताव्यस्त, तर काही फाटक्या, अस्वच्छ दिसतात. रुग्णालयाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर बाधित रुग्णांना उपचारासाठी बेड असून तेथेही हीच परिस्थिती आहे.
येथे ६०० ऑक्सिजन बेड असून त्यात १०० बेड अधिक वाढविता येणार आहेत. यासाठी या ठिकाणी २३ केएलचा ऑक्सिजनसाठा असून स्वयंनिर्मित ऑक्सिजन प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे. असे सगळे असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या रुग्णालयाची दुरवस्था होत चालली आहे. येथील टायलेट, बेसिनचे नळही चोरीला गेले आहेत. तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही यथातथाच आहे. ही व्यवस्थित सोय अद्यापही करण्यात आलेली नसल्याने अधिकाऱ्यांच्या आम्ही सज्ज आहोत हे म्हणण्याला काहीच अर्थ नसल्याचे अधोरेखित होत आहे.
महापालिकेकडून अशी होणार व्यवस्था
दोन दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने वाढून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आठशेच्या घरात गेल्यानंतर तिसऱ्या लाटेचे संकेत लक्षात घेत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने साडेतेरा हजार बेडचे नियोजन केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात पालिका व खासगी मिळून ८५०० बेड्स उपलब्ध असून त्यात साडेतीन हजार ऑक्सिजन बेड तर ७९३ व्हेंटिलेटर बेड असणार आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रतिदिन ४०० मेट्रिक टन उपलब्धतेचेही नियोजन आहे.
नाशिकमध्ये ओमायक्रॉन बाधीत एक रुग्ण ऑढळल्याने धोका लक्षात घेत पालिकेने आणखी पाच हजार बेडचे नियोजन केले आहे. त्यात, आडगाव येथील समाजकल्याण वसतीगृह, एमईटी महाविद्यालय व के. के. वाघ महाविद्यालयाचे वसतीगृह अधिग्रहीत करण्याचा विचार आहे. गरज भासल्यास हा पर्याय वापरला जाणार आहे. तर शहरातील खासगी विविध सेवाभावी संस्था आणि महापालिकेच्या माध्यमातून २३ पीएसए प्लँट उभारण्यात आले असून, त्यापैकी २१ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. त्यापासून २३ मे. टन आॉक्सिजन उपलब्ध होणार आहे.
लक्ष देण्याची गरज
नाशिक शहरात देखील रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने नाशिकरोड येथील कोविड सेंटरमध्ये तत्काळ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे - संतोष साळवे, नगरसेवक
आम्ही सज्ज आहोत..!
या सेंटरमध्ये ७०० बेड सज्ज आहेत. गरज पडल्यास मोकळ्या जागेतही बेड लाऊ ऑक्सिजन, व्हेटिंलेटर व औषधे हे सध्या मुबलक आहे.- डॉ. जितेंद्र धनेश्वर, कोविड सेंटर प्रमुख
8500 बेड्स पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणार असून त्यात महापालिका रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये एकूण ३३०० बेड्सची व्यवस्था आहे. त्यापैकी २२०० बेड्स ऑक्सिजनचे आहेत. सर्वाधिक ६५० ऑक्सिजन बेड्स नवीन बिटको रुग्णालयात आहेत. गरज पडल्यास आणखी २५० बेड्सची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
सर्वत्र अस्वच्छता
सर्वत्र घाण, कोपऱ्यांमध्ये गुटखा, पानाच्या पिचकाऱ्या, टॉयलेटमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे डॉक्टरही हैराण झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.