आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैद्राबाद येथील एअर फोर्स अकॅडमीमध्ये झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये नाशिकचे प्रणव जोपळे आणि पंकज जांगरा या दोघांनी वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची भारतीय हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर पदी नियुक्ती झाली.
प्रणव याने एनडीएची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून एअर फोर्स अकॅडमी हैदराबाद येथे प्रवेश घेतला. एका वर्षातील या प्रशिक्षणात त्याने हवाई दलाच्या विविध विमान व त्यांचे उड्डाण याबाबत विशेष प्राविण्य आत्मसात केले. या सर्व जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय वायू सेनेत फायटर पायलट हे पद मिळविले. या कार्यक्रमासाठी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रणव जोपळे हा नाशिकमधील बोरगड येथे राहतो. सी.डी.ओ.मेरी या शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. शाळेतील शिक्षकांनी प्रणवची आवड लक्षात घेऊन त्याला एनडीएची तयारीसाठी मार्गदर्शन केले.
नाशिकमध्ये राहूनच एनडीएची तयारी केली. इयत्ता दहावीत 93% गुण मिळवून यश प्राप्त केले. आर.वाय.के. कॉलेज येथे प्रवेश घेऊन त्याने तयारी सुरु ठेवली. पहाटेपासून ते रात्रीचे उशिरापर्यंत कॉलेज, क्लास, खेळ आणि चिकाटीने अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. या काळात स्कॉड्रन लीडर निलेश खैरनार व त्यांचे वडील दगडू खैरनार यांनी त्याला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. जिद्द आणि चिकाटीने त्याने एनडीएची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली व भारतीय वायू सेनेत जाण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. येथे 5 महिने खडतर प्रशिक्षण त्यानंतर 1 महिना सुट्टी मिळत असे. परंतु सन २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या सुट्टीलाही प्रशिक्षणार्थींना मुकावे लागले. या काळात त्याला स्वत:च्या बहिणीच्या लग्नाला सुद्धा हजर राहता आले नाही. त्याला अशोकस्तंभ येथील सुदर्शन अकॅडमीचे हर्षल आहेरराव यांचे मार्गदर्शन लाभले.
---
मुलाखतीत आठ वेळा अपयश
शालेय जीवनापासूनच पंकजची वैमानिक बनण्याची इच्छा होती. त्यासाठी बारावीत असताना एनडीएची परीक्षा देखील दिली होती. मात्र त्यात त्याला अपयश आले. त्यानंतर अभियांत्रिकीच्या अभ्यासासोबतच त्याने एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट तसेच कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षांची तयारी सुरु केली. या दोनही परीक्षा पास होऊन तो मुलाखतीपर्यंत पोहोचला. मात्र मुलाखतीत त्याला पुन्हा अपयश आले. सलग आठ वेळा तो मुलाखतीमध्ये अपयशी ठरला. परंतु प्रत्येक वेळी झालेल्या चुकांमधून शिकून तो अधिक जोमाने तयारी केली. नवव्या प्रयत्नात त्याने स्वतःला सिद्ध केले आणि गुजरातमधील गांधीनगर एअर फोर्स सिलेक्शन बोर्डमधून मुलाखत उत्तीर्ण झाला. त्यानंतर एअर फोर्सचे दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.