आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाकडे...:नाशिकच उद्योगांसाठी आता बेस्ट डेस्टिनेशन ; भुजबळ यांचे प्रतिपादन, आयमा इंडेक्सचे उद्घाटन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुण्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाला असून आता महाराष्ट्रात नाशिक हेच उद्योगांसाठी महत्त्वाचे डेस्टिनेशन आहे. महाराष्ट्रात अधिक उद्योग यावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिकला चांगलं हवामान लाभलं असून ते मुंबई पुण्यासारखे नक्कीच झाले पाहिजे. मात्र इतर शहरात काही चुकीची पाऊले पडली असतील त्याचा अभ्यास करून विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच उद्योजकांचे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भुजबळ यांच्या हस्ते शहरातील डोंगरे वसतिगृह मैदान येथे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘आयमा इंडेक्स २०२२’ या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, एचएएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपेंदिव मैती, हिरानंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण, रंजन ठाकरे, आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल, माजी अध्यक्ष वरुण तलवार, सेक्रेटरी ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आदी होते. आयमा इंडेक्सच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ८५० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी या उद्योजकांचे स्वागत केले. नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून उद्योगांना आवश्यक असे वातावरण आम्ही तयार केले. नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिले विमानतळ बांधले, एचएएलच्या माध्यमातून येथे विमानसेवा सुरू झाली, या विमानतळावर पार्किंगची सुविधा असल्याने याठिकाणी मुंबईहून अहमदाबादला पार्किंगसाठी जाणारी विमाने यावीत, अशी मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जाणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असून महाविकास आघाडी सरकार काम करत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रभाव संपला असून शासन विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असू उद्योजकांनी देखील गेल्या दोन वर्षांचा बॅकलोक भरून काढावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल यांनी मनोगत व्यक्त करताना अंबड औद्योगिक वसाहतीत बहुप्रतीक्षित सीईटीपी प्रकल्प पूर्ण करण्यात यावा तसेच उद्योजकांना सतावणारा फायर सेसचा विषय मार्गी लावावा, अशी अपेक्षा भुजबळ यांच्याकडे व्यक्त केली. तर आयमा इंडेक्सच्या माध्यमानूत नाशकात औद्योगिक गुंतवणूक येणार असून यातून जिल्ह्यातील रोजगार वाढणार असल्याकडे इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे यांनी लक्ष वेधले.

तुम्ही उद्योग करा, भांडू नका
निमामध्ये रंगलेले राजकारण शहरभरात मनोरंजनाचा विषय बनला होता, याचा धागा पकडत तुम्ही भांडता कशाला? आम्ही त्याकरिता आहोत, राजकारण आम्ही करू ते आमच्यावर सोडून द्या, तुम्ही उद्योग करा, राजकारणासाठी लागणारा वेळ उद्योगासाठी द्या, दुप्पट नफा कमवाल आणि शासनालाही जास्त महसूल मिळेल, असे चिमटे उपस्थितांना भुजबळ यांनी काढल्यावर सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...