आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाचे संकट तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पिछाडी लक्षात घेत, नाशिक व जळगाव या दोन जिल्ह्यांची केंद्र शासनाने ‘नीडल फ्री’ (सिरिंजशिवाय) लसीकरणासाठी निवड केली आहे.
या मोहिमेंतर्गत ज्यांना सिरिंज टोचण्याची भीती वाटत आहे अशा लसीकरणापासून दूर असलेल्या नागरिकांना ‘झायकोव-डी’ ही नीडल फ्री लस दिली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यातील अन्य जिल्ह्यातही अंमलबजावणी केली जाणार आहे.
अवघ्या ३६ टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण : नाशिक शहर व जिल्ह्यासाठी ५१ लाख ७५ हजार ८८९ नागरिकांचे उद्दिष्ट लसीकरणासाठी निश्चित करण्यात आले होते. परंतु ११ महिने उलटल्यानंतर ३९ लाख ४७ हजार ४४ नागरिकांनी पहिला तर,१८ लाख ४८ हजार ८५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ७६ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३६ टक्के आहे.
‘झायकोव-डी’ चे तीन डोस; आठ लाख डोस : केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केल्यानंतर नाशिक व जळगावला प्रत्येकी आठ लाख डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक प्रमाणेच जळगावचाही लसीकरणात टक्का कमी आहे.
मार्गदर्शक तत्त्व आल्यानंतर लसीकरण : नीडल फ्री लसीच्या पायलट प्रोजेक्टसाठी नाशिकची निवड झाली असून याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर तसेच लसींचा साठा आल्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली जाईल,असे मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. दरम्यान, या नीडल फ्री लसीकरणाला किती प्रतिसाद मिळतो, यावरही सर्व काही अवलंबून असल्याचे सांगयात येत आहे.
मशीनच्या मदतीने त्वचेमधून देणार लस
शहर व जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या तीन लस दिल्या जात असून नीडल फ्री म्हणून ‘झायकोव-डी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. एका मशीनच्या साहाय्याने त्वचेमधून ही लस दिली जाणार असून २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस दिले जाणार आहेत. त्वचेवर संबंधित मशीन ठेवले जाणार असून कोणतीही टोचणी न करता लसीचे घटक शरीरात सोडले जाणार आहेत अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.