आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेच्या छत्रछायेखाली ‘शेतकरी विकास पॅनल’ तयार करून माजी संचालक शिवाजी चुंभळे यांनी माजी खासदार देविदास पिंगळे यांची नाकेबंदी सुरू केली. तरीही, त्यादृष्टीने महत्वपूर्ण सुनावणीवर मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारीतील पणन खात्याने पुढील तारीख दिल्यामुळे पिंगळेवरील नेम चुकला; मात्र घायाळ चुंभळेच झाल्याचे चित्र साेमवारी हाेते. या निवडणुकीत पिंगळे अपात्र झाले तर प्रतिस्पर्धी पॅनलला धक्का बसणार असून त्यादृष्टीने आवश्यक मदत चुंभळे गटाला हाेत नसल्यामुळे अस्वस्थता पसरल्याचे बाेलले जाते.
कृषी उत्पन्न बाजार समितीवरील वर्चस्ववादावरून जवळपास सात ते आठ वर्षापासून पिंगळे विरूद्ध चुंभळे यांच्यात राजकीय सवतासुभा सुरू आहे. गेल्यावेळी पिंगळे यांनी राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्यामदतीने बाजार समितीवरील वर्चस्व कायम ठेवले हाेते. त्यानंतर पिंगळे यांनी केवळ एकट्या दुकट्या संचालकांच्या जाेरावर पिंगळे यांच्याच पॅनलमधील दिग्गजांना गळाला लावत काही काळ सभापतीपदही भुषवले मात्र, पिंगळे यांनी पुन्हा बाजी पलटवली हाेती.
यंदा, ही बाब लक्षात घेत पिंगळे यांना काेणत्याही परिस्थीतीत बाजार समितीतून पायउतार करण्याचा चंगच चुंभळे यांनी बांधला आहे. त्यासाठी त्यांनी थेट सत्तेची दरवाजे ठाेठावली असून शिंदे शिवसेनेच्या छताखाली ते जमवाजमव करताना दिसत आहे. साेबतच दिनकर पाटील यांच्यारूपाने राज्यातील भाजप हा सत्ताधारी पक्षही साेबत आहे. ही बाब लक्षात घेत पिंगळे यांना थेट मागील काळातील कथित गैरव्यवहाराच्यानुषंगाने अपात्र करण्यासाठी चुंभळे यांनी जाेर लावला. मात्र त्यांना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुखंडांकडून दिलासा मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील पणन खात्याकडे धाव घेतली.
या अर्जावर साेमवारी सुनावणी अपेक्षित हाेती मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे अयाेध्या दाैऱ्यावर होते. तसेच परतल्यानंतर त्यानी थेट शेतकरी नुकसानीची पाहाणी करण्यासाठी धाव घेतल्यामुळे या अर्जावर सुनावणीच झाली नाही. त्यामुळे पिंगळेंना दिलासा तर चुंभळेंना धक्का बसल्याचे चित्र हाेते.
महाविकास आघाडीची बैठक होणार
उद्धव ठाकरे यांची शिवसेना इतके दिवस बाजार समिती निवडणुकीपासून चार हात लांबच हाेती यंदा मात्र, ठाकरे गटाने राष्ट्रवादीच्या मदतीने लहान भावाची भुमिका घेत दाेन ते तीन जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादीची बैठक हाेणार असल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
पहिल्या दिवशी एकही माघारी नाही
कृउबा निवडणुकीच्या १८ जागांसाठी १३७ उमेदवारांचे १७० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात हमाल मापारी गट बिनविराेध झाली असून १७ जागांसाठी १७० जणांपैकी काेण माघार घेते हे बघणे महत्वाचे आहे. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून माघारीच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज माघारी गेलेला नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.